आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपडताळणीसाठी २ खिडक्या, दररोज १५० जण वेटिंगवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे. संपूर्ण जिल्हाभरातून सकाळी नऊ वाजेपासूनच कार्यालयात जवळपास ५०० ते ६०० विद्यार्थी व पालक अर्ज जमा करण्यासाठी येत आहे. मात्र, अर्ज जमा करण्यासाठी केवळ दोनच खिडक्यांची सोय असल्याने दिवस-दिवसभर विद्यार्थ्यांना व पालकांना रांगेत उभे रहावे लागत आहे. विशेष म्हणजे, दररोज अनेक विद्यार्थ्यांना सायंकाळी 'वेटिंग लिस्ट'मध्ये आपले नाव टाकले असून, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला दिला जात असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली आहे. 


उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून समाजकल्याण विभागातील जातपडताळणी विभागाकडे जिल्हाभरातून विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे. आधीच गेल्या वर्षी जातपडताळणी कमिटीकडे सादर करण्यात आलेली शेकडो प्रकरणे रखडली आहे. त्यात आता हजारो प्रकरणे नव्याने दाखल केली जात आहे. नवीन प्रकरणे कार्यालयात जमा करण्यासाठी समाजकल्याण विभागात विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून शेकडो विद्यार्थ्यांच्या रांगा कार्यालयाच्या पार्किंगमध्ये लागत असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रकरण जमा करून घेण्यासाठी तसेच दाखले वितरण करण्यासाठी चार ते पाच खिडक्यांची सोय उपलब्ध करून देण्याची गरज असताना कुठलीही सुविधा उपलब्ध करून न देता प्रकरण जमा करण्यासाठी 'वेटिंग लिस्ट' तयार करत पुढची तारीख दिली जात आहे. परिणामी, पालकांना प्रकरण जमा करण्यासाठीही आता दररोज चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकवर्गामध्ये नाराजीचा सूर आहे. 


प्रकरण जमा करण्यासाठीही वेटिंग 
कामावर न जाता जातपडताळणीचे प्रकरण जमा करण्यासाठी समाजकल्याण विभागात चकरा मारत आहे. सायंकाळी नंबर आला की तुम्ही उद्या या, आता वेळ संपली असे सांगितले जात आहे, असे एका तक्रारदाराने सांगितले. 


नाशकात सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित 
नुकताच जातपडताळणीसंदर्भात समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघचौरे यांच्यासह बार्टीचे संचालक कैलास केशी व समाजकल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील यांच्या उपस्थितीत झालेली व्हिडिआे काॅन्फरन्स बैठकीत सचिव दिनेश वाघचौरे यांनी नाशिकच्या जातपडताळणी समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. राज्यभरात सर्वाधिक जातपडताळणीची प्रकरणे नाशकातच प्रलंबित असल्याचे सांगितले. शैक्षणिक कामांसाठी लागणारे जातपडताळणीचे प्रकरण एका दिवसात निकाली काढण्याचे आदेश दिले. 

बातम्या आणखी आहेत...