आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाममात्र भाड्याने ९०३ मिळकतींची सुभेदारी करणारे मुंढेंच्या रडारवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एक रुपयापासून तर ११ रुपयांपर्यंत नाममात्र भाड्याने शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली महापालिकेच्या मालकीची समाजमंदिरे, वाचनालये, अभ्यासिका, व्यायामशाळा आदी ९०३ मिळकती पदरात पाडणाऱ्या सामाजिक, स्वयंसेवी मंडळांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका देत नोटिसा बजावल्या आहेत. मिळकतींच्या वापरापासून ते थकबाकीपर्यंतच्या सर्व बाबींबाबत खुलासा मागवला असून समाधानकारक खुलासा करणाऱ्या मिळकती महापालिका ताब्यात घेणार आहेत. 

 

महापालिकेच्या मिळकतींचा गैरवापर होत असल्याची तक्रार आमदार सीमा हिरे यांच्या समर्थ अभ्यासिका प्रकरणात अॅड बाळासाहेब चौधरी यांनी केली होती. पुढे उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर सर्वच मिळकती महापालिकेने ताब्यात घेऊन रेडीरेकनरनुसार त्याचे भाडे आकारणी करावी, असेही अादेश महापालिकेला आले. पुढे हिरे यांनी कायदेशीर लढाई लढवत चाैधरी यांचे अाराेप तथ्यहिन व वैयक्तिक असल्याचे किंबहुना चाैधरी यांच्या वकीलपदाच्या पदवीबाबतही अाक्षेप घेतले. त्यानंतर मात्र, तत्कालीन अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या मालकीची समाजमंदिरे, वाचनालये, अभ्यासिका, व्यायामशाळा व रिकामे भूखंड हे सामाजिक संस्थांना नाममात्र किमतीत देण्याची चाैकशी सुरू केली. त्यापुर्वी अशा मिळकतींना रेडीरेकनरनुसार भाडे अाकारणीचा प्रस्ताव महासभेवर अाल्यावर दर कमी करण्याबाबत महासभेने गटनेत्यांची समिती गठित केली. मात्र, पुढे प्रकरण भिजत पडले. दरम्यान, गेडाम यांनी मिळकतीचे सर्वक्षण करून वापरकर्त्या सामाजिक संस्थांचा ताळेबंदापासून तर उपक्रमाबाबत माहिती मागवली. त्यामुळे धाबे दणालेल्या मंडळांकडून अहवाल येत असतानाच गेडाम यांची बदली झाल्यामुळे विषय मागे पडला. अाता मुंढे यांनी उत्पन्नवाढीसाठी मिळकतींची बाब मनावर घेतली अाहे. त्याचाच एक भाग म्हणून ९०३ मिळकतधारकांना नाेटिसा बजावण्यात अाल्या अाहेत. यात मिळकतीचे स्वरूप, जागेची किंमत व चालू बाजारमूल्य वा भाडे, मिळकतींचा वापर स्वत: करतात की पोटभाडेकरू ठेवले आहेत. मिळकतीचा वापर करताना मनपासोबत करारनामा केला आहे का, करारनामा असल्यास नियमित भाडे भरले जाते का, मिळकतीचा वापर कोणत्या प्रयोजनासाठी केला जातो आदी बाबींचा खुलासा या नोटिसीद्वारे सात दिवसात मागविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. 


अाता १५ लाख; उद्या ७० काेटी मिळेल 
शहरातील अत्यंत माेक्याच्या जागी असलेल्या मिळकती वाऱ्यावर असून सध्या ९०३ मिळकतींमधून महापालिकेला दरवर्षी सुमारे १५ लाख रुपये भाडे मिळत असल्याचा अंदाज अाहे. या मिळकतींना रेडीरेकनरचा दर लागल्यास महापालिकेच्या तिजोरीत तब्बल ६० ते ७० कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. 


बहुतांश मिळकतींवर राजकीय पुढाऱ्यांची सुभेदारी 
एक रुपया ते १११ रुपये वार्षिक भाडेपट्ट्याने अापल्याकडील नाेंदणीकृत मंडळ, सामाजिक संस्थांकडे राजकीय पुढाऱ्यांनीच घेतल्या अाहेत. जुलै २०१६ मध्ये डाॅ. गेडाम यांनी ७५० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवसभर राबवलेल्या गुप्त माेहिमेचा अहवाल अाता मुंढे यांनी अभ्यास करून नाेटीस अस्त्र उगारले अाहेत. त्यामुळे अशा मिळकतीवर भुजंगाप्रमाणे बसून असलेल्या सामाजिक संस्थांसह नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे चित्र अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...