आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-मनसे सदस्यांसमाेर मुंढे मांडणार अंदाजपत्रक; भाजप करणार कायदेशीर विराेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक नाशिकच्या शब्दपूर्तीसाठी पाठवलेल्या अायुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपला दणके देणे सुरूच ठेवले असून, स्थायी समितीची २८ फेब्रुवारी राेजी मुदत संपल्यानंतर १ मार्च राेजी नगरसचिवांना पत्र देत ७ मार्च राेजी स्थायी समितीवर अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला अाहे. यात माेठी गंमत म्हणजे स्थायी समितीवरील नऊही भाजपचे सदस्य चिठ्ठी व राजीनाम्याने निवृत्त झाले असल्यामुळे अाता शिवसेनेचे दाेन तर मनसे काेट्यातील एक अपक्ष अशा तीन सदस्यांसमाेरच अायुक्तांचे अंदाजपत्रक मांडले जाणार अाहे. 


महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाच ठेंगा दाखवल्याची मुंढे यांची कृती अाता भाजपच्या चांगल्याच जिव्हारी लागली अाहे. त्यातून सभापती नसताना अंदाजपत्रक सादर करण्याची अायुक्तांचीच कृती नियमबाह्य ठरेल, असा इशारा महापाैर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी माेरूस्कर व स्थायी समितीचे मावळते अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे यांनी दिला अाहे. 


महापालिकेतील कारभार सुधारण्यासाठी अालेल्या मुंढे यांनी कृतीतून सर्वाधिक हल्ले भाजपवर चढवले अाहेत. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी इतके गाेंधळले अाहेत की विराेध करायचा की शांतपणे तडाखे सहन करायचे, हेही त्यांना समजेनासे झाले अाहे. हल्ले वाढू लागल्यावर भाजपने घरपट्टीतून प्रथम मंुढे यांना दणका देण्याची रणनिती अाखली. पाठाेपाठ शिवसेनेला साेबत घेत स्थायी समितीतून मुंढे यांच्या नियमबाह्य कामकाजावर बाेट ठेवले. स्थायी समितीवर यापूर्वीच्या अायुक्तांनी अंदाजपत्रक मंजुरीचा कार्यक्रम संमत केला हाेता. त्यानुसार २८ फेब्रुवारीपूर्वी अायुक्तांनी अंदाजपत्रक ठेवणे क्रमप्राप्त हाेते. 


२८ फेब्रुवारी राेजी स्थायी समितीच्या विद्यमान सभापती व चिठ्ठी किंवा राजीनाम्याने रिक्त हाेणाऱ्या सदस्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपत हाेता. त्यामुळे १ मार्चपासून पुढील नियुक्तीसाठी महापाैरांना सात दिवसांचा अवधी देत विशेष महासभेची नाेटीस काढणे क्रमप्राप्त हाेते. चिठ्ठीद्वारे निवृत्त झालेल्या अाठ सदस्यांच्या जागी नवख्यांची नियुक्ती झाली असली तरी, त्याबाबत अधिकृत ठराव देऊन प्रक्रियाही प्रलंबित अाहे. अशातच स्थायी समितीने मुंढे यांच्याकडून नियमबाह्यरित्या अंदाजपत्रक लांबणीवर टाकण्याची कृती झाल्याचा अाराेप केला हाेता. त्यामुळे भाजपला दणका देत मुंढे यांनी ७ मार्चला अाता स्थायी समितीसमाेर अंदाजपत्रक मांडण्यासाठी मुहूर्त शाेधला अाहे मात्र या मुहूर्तावर भाजपचा एकही सदस्य स्थायी समितीवर नसणार, यामुळे महापाैरांपासून ते अन्य पदाधिकाऱ्यांपर्यंत असे सर्वजण अपमानामुळे प्रचंड संतप्त झाले अाहेत. 


भाजपचे चार सदस्य चिठ्ठी पद्धतीने निवृत्त हाेऊन त्यांच्या जागी दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढाेमसे व पुष्पा अाव्हाड यांची नियुक्ती झाली अाहे. मात्र त्यासंदर्भातील महासभेचा ठराव अद्याप गेलेला नाही. दुसरीकडे, पाच सदस्यांचे राजीनामे घेतले असून, त्या जागेवर नियुक्तीसाठी ७ मार्च राेजीच सकाळी ११ वाजता महापाैरांनी सभा बाेलावली अाहे. अशा परिस्थितीत भाजपचे स्थायी समितीवरील अस्तित्वच संपुष्टात असून या कालावधीत अायुक्तांचे अंदाजपत्रक दाखल हाेण्याची बाब जिव्हारी लागली अाहे. 


नगरसचिवांसाेबत पदाधिकाऱ्यांची खलबते 
एकुणच या प्रकारामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसचिवांना बाेलवून याबाबतची कायदेशीर प्रक्रिया समजावून घेतली. स्थायी समितीवर १६ सदस्य नसताना म्हणजेच काेरम नसताना अायुक्त अंदाजपत्रक कसे ठेवू शकतात, असाही सवाल दिनकर पाटील यांनी केला. महापाैरांनी नियम काय सांगताे यापेक्षा अशा पद्धतीची कृती याेग्य नसल्याचे माध्यमांशी बाेलताना ठणकावले.

 
हंगामी सभापती नेमणार काेण? 
सभापतींचा कार्यकाळ संपल्यामुळे अाहे त्या सदस्यामधून हंगामी सभापती नेमून अंदाजपत्रक सादर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अाहे. खुद्द मुंढे यांनी माध्यमांशी बाेलताना तसे संकेत दिले. मात्र भाजपचे नऊ, शिवसेनेचे दाेन, काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक याप्रमाणे तेरा सदस्य गेल्यानंतर उर्वरित तीन सदस्यातून हंगामी सभापती कसा निवडणार, त्यामुळे काेरम पूर्ण हाेईल का, असे असंख्य प्रश्न सर्वांनाच पडले अाहेत. 


विशेष महासभेला समांतर अंदाजपत्रक सभा 
महापाैर रंजना भानसी यांनी ७ मार्च राेजी स्थायीवरील सदस्य नियुक्तीसाठी सकाळी ११ वाजता विशेष महासभा बाेलावली अाहे. याच दिवशी व याच वेळेत अायुक्तांनी अंदाजपत्रक स्थायीवर मांडण्याची तयारी केली अाहे. त्यामुळे महापाैरांना धक्का बसला असून महासभेची नाेटीस वर्तमानपत्रात जाहीर झाल्यानंतर अायुक्तांनी अशा पद्धतीने समांतर अंदाजपत्रकीय सभा लावलीच कशी, असा त्यांनाही प्रश्न पडला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...