आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांना वेठीस धरल्यामुळे मुंढेंविरोधात अविश्वास ठरावाचे ढग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महासभेत खरपूस समाचार घेतल्यानंतरही अायुक्त तुकाराम मुंढे हे नाशिककरांना करवाढीच्या खाईत लाेटू पहात असल्याचे किंबहुना, करवाढ, महासभेचे अधिकार, नगरसेवक निधीसह अन्य विषयाबाबतही उद्दाम वर्तणूक कायम असल्याचे लक्षात घेत अाता, नवी मुंबईच्या धर्तीवर त्यांच्यावर अविश्वास ठरावासाठी हालचाली गतिमान झाल्याचे वृत्त अाहे.

 

भाजपच्याच नगरसेवकांनी त्यासाठी रेटा लावला असून, कामेच हाेणार नसतील तर नगरसेवकपद कशाला असा प्रश्न यापूर्वीच पक्ष बैठकीत व्यक्त केल्यामुळे ताेच धागा पकडून शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांची महापाैरांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चाचपणीही सुरू झाली अाहे.

 

मुंढे विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष अाता चिघळला असल्याचे चित्र असून त्याचे कारण म्हणजे काेणाचेही एेकून न घेता ‘हम कराे साे कायदा’ या पद्धतीने त्यांचे कामकाज सुरू असल्याचे कारण दिले जात अाहे. त्याची परिणती म्हणून गत सहा महिन्यांपासून सहन करणाऱ्या नगरसेवकांनी महासभेत मुंढे यांच्याविराेधात हल्लाबाेल करीत अन्यायकारक करवाढ रद्द करण्यास महापाैरांना भाग पाडले. त्यानंतर शनिवारी मात्र मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत महासभेचा निर्णय कसा बेकायदेशीर इथपासून तर, राज्य शासनाला अर्थातच अप्रत्यक्षपणे भाजपलाच करवाढ बेकायदेशीर असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे अाव्हान दिले. यापूर्वीही पालकमंत्री गिरीश महाजन यांचाही जाहीररित्या अवमान हाेईल अशा पद्धतीने त्यांच्यासमाेर उत्तरे दिल्याची बाबही भाजपला खटकली हाेती. त्यात, करवाढ रद्द केल्यानंतर मुंढे यांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे नगरसेवकांचा संताप वाढला अाहे. त्यातून अधिवेशनातून परतलेल्या अामदार सानप यांनी शनिवारी ‘रामायण’ या महापाैर निवासस्थानी तातडीने धाव घेतली. या ठिकाणी निवडक पदाधिकारी व ज्येष्ठ नगरसेवकांशी चर्चा केल्यानंतर अविश्वास ठरावाबाबत विराेधी पक्षांचे मत जाणून घेत पुढील रणनीतीबाबत चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

 

पाटील यांच्याकडे सर्वपक्षीय चर्चेची जबाबदारी : महासभेचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा अाराेप मुंढे यांनी केल्यानंतर अाता भाजपने निर्णायक अस्त्र उपसण्याची तयारी सुरू केली अाहे. त्यासाठी सभागृहनेता पाटील यांच्याकडे सर्वपक्षीयांशी चर्चा करण्याची जबाबदारी देत त्यांचे नेमके मत जाणून घेतले जाणार असल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

 

पालकमंत्र्यांचा दाेन वेळा अवमान हाही प्रमुख मुद्दा :  १ मे राेजी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमासाठी राजशिष्टाचाराचा भंग करून वेळेत उपस्थिती न लावण्याच्या अायुक्त मुंढे यांच्या प्रकारामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा अवमान केल्याची भावना अाजही भाजप अामदार तसेच नगरसेवक व्यक्त करीत अाहेत. अशातच, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अावारालगत रुग्णवाहिका उभ्या करण्याच्या मागणीबाबत चर्चा करताना पालकमंत्र्यांनी काय ताेडगा काढता येईल यावर विचारणा केल्यावर मुंढे यांनी रुग्णालयाच्या भिंतीबाहेर जागा देता येत नसल्याचे ठणकावत ‘मॅटर इज एण्ड’ असे ठणकावले हाेते. त्यानंतर पालकमंत्र्यांवर ‘तुम्ही नंतर या; ताेडगा काढू’ असे सांगण्याची नाैबत अाली हाेती. हा दुसरा अवमानही भाजपच्या जिव्हारी लागला असून, त्यामुळे भाजपकडून मुंढेंना धडा शिकवण्याची रणनीती अाखली जात अाहे.

 

सामान्य जनताच 'टार्गेट'
मुळात नैसर्गिकरित्या हाेणाऱ्या करवाढीला काेणाचाही विराेध नसून ४०० ते १९०० पटीपर्यंत वाढीला विराेध अाहे. यापूर्वी करवाढच झाली नाही, असे कारण देत संपूर्ण अनुशेष वसुलीच्या मुद्याला विराेध अाहे. मात्र त्यात न पडता मुंढे यांनी केवळ प्रतिष्ठेचा विषय करीत कायदेशीर, बेकायदेशीर यावरच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्याबराेबरच नेहमीप्रमाणे उत्पन्न वाढले नाही तर कामे कशी हाेणार असा नेहमीचाच सवाल केला. वस्तुत: सामान्यांवर करवाढ साेडून शहरात जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न, व्यापारी संकुल, महत्त्वाच्या माेक्याच्या मिळकती भाडेतत्त्वावर देताना येणारे उत्पन्न याबाबत फार खाेलात शिरणे टाळले. त्यामुळे केवळ सामान्य जनताच उत्पन्न वाढीसाठी टार्गेट का हा प्रश्न कायम राहिला.

 

अधिकार वाचवण्यासाठी २७ जुलैला विशेष महासभा
काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका डाॅ. हेमलता पाटील यांनी नगरसेवकांना मिळणाऱ्या हिन वर्तणुकीसंदर्भात लक्षवेधी दाखल केली हाेती. मात्र, गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत अन्य विषयच चालल्यामुळे त्यावर चर्चा अाता विशेष महासभेत हाेणार अाहे. याच महासभेत महापाैरांचे अधिकार, महासभा व अन्य मुद्यावरही चर्चा हाेणार अाहे. ही विशेष महासभा बाेलवण्यासाठी स्थायी समिती सभापती हिमगाैरी अाडके अाहेर, सभागृहनेते दिनकर पाटील, उद्धव निमसे यांच्यासह अन्य दाेन सदस्यांच्या स्वाक्षरी अाहे. २७ जुलै राेजी ही महासभा हाेण्याची शक्यता अाहे.

बातम्या आणखी आहेत...