आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी माघारीसाठी अखेरीस रंगले नाट्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- एक वेळा खासदार अन् दोन वेळेस आमदार राहिलेले प्रतापदादा सोनवणे यांच्या माघारीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी विभागीय महसूल आयुक्तालयात पायघड्या टाकल्या होत्या. माघारीसाठी दादाही आयुक्तालयापर्यंत आले होते. अर्ज घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर गेलेही. परंतु, कुठे माशी शिंकली अन‌्् मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही माघारी न होताच उमेदवारी कायम राहिली. 


शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. २ वाजून ४० मिनिटांमध्ये शांततेमध्ये माघारी घेण्याचे काम सुरू होते. तेवढ्यात महसूल आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवार प्रतापदादा सोनवणे यांच्या वाहनापाठोपाठ आमदार बाळासाहेब सानप, संघटनमंत्री किशोर काळकर, वसंत गिते, विजय साने, लक्ष्मण सावजी आणि भाजपकडून शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार अनिकेत पाटील हे दाखल झाले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप गाडीतून उतरताच घाईघाईने प्रतापदादा यांना घेण्यासाठी त्यांच्या गाडीजवळ गेले. अर्ज माघारीसाठी प्रतापदादांसह भाजपचे इतर उमेदवार हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात गेले. मात्र, यावेळी बैठक विस्कटली तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी तुम्ही बाहेर जाऊन निर्णय अंतिम करा, मग माघारी घ्या असे सांगून त्यांना बाहेर बोलणीसाठी पाठविले. त्यावेळी राजाराम माने यांचे स्वीय सहायक असलेले विजय सोनवणे यांच्या दालनामध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप, संघटनमंत्री किशोर काळकर, विजय साने, लक्ष्मण सावजी यांनी विनंती केली. मात्र, प्रतापदादा ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. याचवेळी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी प्रतापदादांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन आला होता. तरीही दादा ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते. हे कमी की काय म्हणून स्वीय सहायकाच्या दालनामध्ये काँग्रेसचे माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनीदेखील दादांच्या माघारीसाठी प्रयत्न केला. या मनवामनवीमध्येच ३ वाजून ७ मिनिटे झाली अन‌् भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा चेहरा काळवंडला. मुदत संपून गेल्याचे लक्षात आल्यानंतर एका-एकाने आयुक्तालयाबाहेर जाण्यास सुरुवात केली. 


अाता नाशिक विभाग शिक्षक अमादार मतदार संघाच्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यामधून पाच, अहमदनगर जिल्ह्यातून सात, धुळे जिल्ह्यातील तीन तर जळगाव जिल्ह्यातील एक उमेदवार अखरेच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात राहिले अाहेत. 


स्वीय सहायकाकडून मात्र आवभगत 
निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल आयुक्त राजाराम माने काटेकोर नियमांचे पालन करताना दिसून येत आहे. प्रतापदादांच्या माघारीसाठी माने यांच्या दालनामध्ये दादा आणि भाजप पदाधिकारी यांची चर्चा सुरू होताच त्यांनी बाहेर जाऊन तुम्ही चर्चा करा, मग माघार घ्या, असे सांगितले. मात्र, दुसरीकडे माने यांचे स्वीय सहायक विजय सोनवणे यांनी स्वत:च्या दालनामध्ये चर्चेला जागा देऊन आवभगत करीत असल्याचे पाहून उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती. 


रिंगणात १६ उमेदवार 
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या माघारीसाठी ११ जून रोजी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. आठ उमेदवारांनी माघार घेतली असून रिंगणात १६ उमेदवार राहिले आहे. यामध्येही प्रमुख चुरस चार ते पाच उमेदवारांमध्येच आहे. 


नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी एकूण २५ अर्ज दाखल करण्यात आले होते. यामध्ये एका उमेदवाराचे वय हे कमी असल्याने त्याचा अर्ज बाद झाला. कुणाल दराडे, गजानन खराटे, महेश शिरुडे, सुनील बच्छाव, सुनील फरस, सुरेश पाटील, दिनेश देवरे, प्रकाश सोनवणे यांनी माघार घेतली. एकूण ८ उमेदवारांनी माघार घेतल्यामुुळे १६ उमेदवार रिंगणात आहे. निवडणुकीसाठी नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये मतदानासाठी शिक्षकांनी सर्वाधिक नोंद केलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी या दाेन्ही जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जळगाव जिल्ह्यातून एकच उमेदवार असल्याने त्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याने उमेदवारांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे. 


जिल्हानिहाय शिल्लक उमेदवार असे 
नाशिक :
अनिकेत विजय पाटील, प्रतापदादा सोनवणे, किशोर दराडे, महादेव चव्हाण, मुख्तार कासीम 
जळगाव : शालिग्राम भिरुड 
नगर : भाऊसाहेब कचरे, सुनील पंडित, अजित दिवटे, आप्पासाहेब शिंदे, रवींद्र पटेकर, विठ्ठल पानसरे, बाबासाहेब गांगरडे, 
धुळे : संदीप बेडसे, अशोक पाटील, विलास पाटील 

बातम्या आणखी आहेत...