आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशी तरुणीचा मावशीनेच केला सौदा; नाशकातील देहविक्री प्रकरण, तिघांना अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देहविक्री करण्यासाठी सख्या मावशीने तरुणीचा सौदा करत तिची  सिन्नर, मुंबई आणि कोलकाता येथे विक्री केली. तरुणीची  खरेदी करणाऱ्या मुसळगाव एमआयडीसी परिसरातील कुख्यात ‘नानी’सह  तीन संशयितांना पोलिसांना अटक केली.   या प्रकरणातील संशयित  दलाल आणि मावशी मात्र फरार आहेत. पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांसमोर आपबीती कथन केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बुधवारी कारवाई करत संशयितांना बेड्या ठोकल्या. यानिमित्ताने मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला.   


काही महिन्यांपूर्वी बांगलादेशच्या एका तरुणीची तिच्या मावशीने सिन्नर येथील मुसळगाव परिसरात कुख्यात ‘नानी’च्या कोठीवर विक्री केली. त्यानंतर पीडित तरुणीला देहविक्रीच्या व्यावसायात लोटण्यात आले. काही महिन्यांनंतर नानीने तरुणीची मुंबई येथील एका कुंटणखान्यात विक्री केली. तेथूनही तिला कोलकाता येथील अड्ड्यावर विकण्यात आले. मात्र, पीडितेने कसाबसा जीव वाचवत येथून पलायन केले. एका तरुणाच्या मदतीने तिने प्रसारमाध्यमांशी संपर्क साधत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसळगाव येथील नानीच्या अड्ड्यावर छापा मारत  संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे, सोनू नरहरी देशमुख, नानी ऊर्फ मंगल नंदकिशोर गंगावणे, या तिघांना अटक केली. पीडित तरुणीची मावशी माजिदा अब्दुल फरार आहे. संशयितांच्या विरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   


दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा   
पीडित तरुणीची विक्री केल्यानंतर नानीचा मुलगा विशाल आणि सोन यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.    

 

बांगलादेशी तरुणींची तस्करी   
बांगलादेशातून तरुणींची देशात विक्री होते. नाशिकमध्ये यापूर्वीही बांगलादेशी तरुणींची सुटका करण्यात आली होती. शहरातील काही कुंटणखान्यात बांगलादेशी तरुणी असल्याचा  संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाने शहर व जिल्ह्यात बांगलादेशी तरुणींची तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...