आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना पदाधिकाऱ्यांची हाॅटेलमध्ये 'दिलजमाई'; विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीसाठी बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीतील बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी महामार्गावरील एका अालिशान हाॅटेलमध्ये रविवारी (दि. २९) झालेल्या बैठकीस झाडून उपस्थिती दर्शविली. चार दिवसात असे काय झाले की, ज्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अाश्चर्यकारकरित्या 'दिलजमाई' झाली, याबाबत सर्वसामान्य शिवसैनिकांमध्येच चर्चा सुरू अाहे. शिवसेनेचे अधिकृत कार्यालय असताना अाणि अाजवर या कार्यालयातील सभागृहातच अंतर्गत बैठका घेण्याची पक्षाची जुनी परंपरा असताना अचानक तारांकित हाॅटेलमध्ये बैठक घेण्याचा 'अर्थ' काय, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित हाेत अाहे. 


विधान परिषदेची निवडणूक अाणि अर्थकारणाचा जवळचा संबंध लावला जाताे. पक्षीय संख्याबळ नसतानाही संबंधित उमेदवारांना माेठ्या प्रमाणात मतांचे दान मिळाल्याचा मागील अनुभव अाहे. त्यामुळे तन अाणि मनाने प्रचार करण्यापेक्षा धनाचा अाधार घेण्याचे प्रमाण इतर निवडणुकांच्या तुलनेने विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अधिक असते, असे लाेकप्रतिनिधी सांगतात. दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजीलाही या निमित्ताने उधाण अाले अाहे. निवडणूक जाहीर हाेताच शिवसेनेत माेठ्या प्रमाणात राजी-नाराजीचे नाट्य रंगले अाहे. एेन निवडणुकीत स्वकीयांकडूनच फटका बसू नये म्हणून खासदार संजय राऊत यांना गेल्या बुधवारी (दि. २५) पाचारण करण्यात अाले हाेते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीतील बैठकीस शहरातील ३० नगरसेवक तर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली हाेती. या बैठकीस इतक्या माेठ्या संख्येने असलेली अनुपस्थिती ही पक्षातील अंतर्गत बेबनावाचे लक्षण मानले गेले. संघटनात्मक फेरबदल अाणि बाहेरुन शिवसेनेत अालेले नरेंद्र दराडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याच्या नाराजीतून अनुपस्थितीचे हत्यार वापरण्यात अाल्याची चर्चा हाेती. महापालिकेचे विराेधीपक्षनेते अजय बाेरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी खुलासा करीत या बैठकीला नगरसेवकांना निमंत्रितच केले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र या खुलाशाने पक्षातील गटबाजी झाकली गेली नाही. अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेत एक्सप्रेस इन हाॅटेलमध्ये विधानपरिषद निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी बैठक बाेलविली. पक्षाचे शालिमार येथे अधिकृत कार्यालय असतांना अाणि या कार्यालयातच अंतर्गत बैठका घेण्याची परंपरा असतांना असे अचानक काय घडले की, शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना या अलिशान हाॅटेलमध्ये जमावे लागले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हाेत अाहे. 


बैठकीला ही मंडळी हाेती उपस्थित
शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री बबन घोलप, महानगर प्रमुख सचिन मराठे व महेश बडवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे व भाऊलाल तांबडे, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम व योगेश घोलप, उदय सांगळे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगसेवक सुधाकर बडगुजर, मनमाडच्या नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, सिन्नरचे नगराध्यक्ष किरण डगळे, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर आदी. 


वादविवादाच्या पार्श्वभूमीवर बैठक 
नरेंद्र दराडे यांच्या माताेश्री संस्थेने काढलेल्या पत्रकात म्हटले अाहे की, विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघासाठी शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त होती. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीवरून अनेक वादविवाद सामान्य जनतेसमोर येत होते, यातूनच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. याच मुद्यावरून नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी एकत्र येत एका बैठकीचे आयोजन केले होते. यात सर्व शिवसेना नेत्यांनी एकत्र येत नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवारीसाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना एकमुखाने पाठिंबा देत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला व शिवसेनेत सर्व काही ठीक असल्याचे दर्शन सामान्य जनतेला घडवले. 


निवडणुकीपर्यंत तरी 'दिलजमाई' टिकेल का? 
दिलजमाईसाठी ही बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती; मात्र माध्यमांना याची कानाेकान खबर लागणार नाही याची काळजी घेण्यात अाली. बैठक 'हसत-खेळत' संपन्न झाली असली तरी ही दिलजमाई किमान निवडणुकीपर्यंत तरी टिकते का हे बघणे अाता अाैत्सूक्याचे ठरणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...