आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्यांच्या चुकीमुळे दोन चिमुकल्यांची हालअपेष्टा; नीरज,अंकित पुढच्या पिढीचे बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- १ जानेवारी २०१३ रोजी सोनईत तिहेरी हत्याकांड झाले तेव्हा नीरज नऊ महिन्यांचा होता आणि अंकित चार महिन्यांचा. नीरज हा या प्रकरणातील मृत संदीप थनवारचा मुलगा तर अंकित हा आरोपी अशोक नवगिरेचा मुलगा. एकावेळी नऊ कुटुंबांना उद्ध्वस्त करणाऱ्या या हत्याकांडामुळे नीरज आणि अंकित दोघेही निराधार झाले आहेत. एक आरोपीचा मुलगा म्हणून आणि दुसरा पीडितेचा मुलगा म्हणून. मोठ्यांच्या चुकांमुळे या दोन्ही चिमुकल्यांच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या आहेत.


हे हत्याकांड घडले तेव्हा त्यातील मृत संदीपचा मुलगा नऊ महिन्यांचा होता. संदीपची पत्नी वैशाली पाच वर्षांपासून त्याला मोठ्या निर्धाराने वाढवत आहे. दुसरीकडे यातील आरोपी अशोक नवगिरे याचा मुलगाही तेव्हा चार महिन्यांचा होता. त्याची पत्नी सोनाली हीदेखील कष्टाने मुलाला वाढवत आहे. या खटल्याचा निकाल लागला तेव्हा नीरजच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याचे समाधान होते. नीरजचा निकालाच्या दिवशी वाढदिवसही होता. त्याला ही महत्त्वाची भेट मिळाल्याचे वैशाली थनवार ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाल्या. तर दुसरीकडे नवगिरेला फाशीची शिक्षा सुनावल्याने त्याची पत्नी सोनालीवर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणात पीडित आणि आरोपी अशा दोन्ही बाजूंची आठ कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

 

दलितांना न्याय द्यावा
या न्यायाबद्दल आम्ही कोर्टाचे आभार मानतो. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जातीय रंग असलेले खटले चालवणार नाही, हा निश्चय  मागे घ्यावा आणि दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रकारेच खटले चालवावेत ही विनंती. -पंकज थनवार, मृत संदीपचा भाऊ

 

सरकारी मदत मिळावी
राहुल हा आमच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. आज कोर्टाने आरोपींना फाशी सुनावून आम्हाला न्याय दिला. पण सरकारने कबूल केलेली मदत अजून मिळालेली नाही. समाजकल्याण खात्याकडून आम्हाला तीही मिळावी, अशी अपेक्षा आहे. 
- सागर कंडारे, मृत राहुलचा भाऊ

 

मी निराधार झाले
माझा तरणाताठा मुलगा मारला, मी निराधार झाले. आज मला राहायलाही घर नाही. न्यायालयाने मला न्याय मिळवून दिला, त्यासाठी त्यांचे आभार. परंतु सरकारने कबूल केलेली नुकसानभरपाई आणि मदतही मिळावी, ही विनंती. 
- कलाबाई घारू, मृत सचिनची आई

 

वरच्या कोर्टात जाणार
माझ्या मुलाला यात गोवलं आहे. घटना दुपारी ३.३० वाजता घडली पण माझ्या मुलाला संदीप कुरेने सायंकाळी ६ वाजता बोलावून नेले. आमच्यावर हा अन्याय झाला आहे. सीआयडीचा तपास दिशाभूल करणारा आहे. आम्ही वरच्या कोर्टात न्याय मागू.
- मालन नवगिरे, आरोपी अशोकची आई

 

आम्हीही उद्ध्वस्त झालो : सीमा दरंदले
या खटल्याच्या केंद्रस्थानी असलेल्या सीमा दरंदलेंनी ‘दिव्य मराठी’कडे तिच्या वेदना व्यक्त केल्या. ‘पाच वर्षांपासून दरंदले कुटुंबातील चार पुरुष गजाआड असल्याने माझ्यासह पाच महिला आणि दोन लहान मुले अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात आहोत, आमचे खाण्याचेही हाल आहेत. आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आम्ही वरच्या कोर्टात न्याय मागू. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मी मागणी करीत आहे.’

बातम्या आणखी आहेत...