आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड लाख जुन्या मिळकतींनाही 'जिझिया' करविळख्याची भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - १ एप्रिल २०१८ पासून अस्तित्वात येणाऱ्या नवीन मिळकतींच्या मालमत्ता करात पाच ते सातपट वाढ करण्याच्या निर्णयामुळे १५ ते ६० वर्षे जुन्या एक लाख ५७ हजार ३५७ मिळकतींना पुनर्विकासाच्या निमित्ताने नवीन करवाढीचा विळखा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. किंबहुना, यापुढे प्रत्येक वर्षी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी येणाऱ्या नवीन मिळकतींच्या करयोग्य मूल्यामध्ये वाढ करण्याच्या हालचाली असल्यामुळे करवाढीची टक्केवारी महत्तम अशा सातपटीवरून आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

 

जुन्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यांमध्ये १८ टक्के वाढ करण्यात आली. मात्र, हातात मालमत्ता कराची देयके पडल्यानंतर नाशिककर गोंधळून गेले असून गेल्या वर्षीच्या व आताच्या घरपट्टी वाढीचा फरक ३८ ते ४० टक्के दिसत आहे. अाता तर १ एप्रिल २०१८ नंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणाऱ्या इमारतींना तब्बल पाच ते सातपट वाढीव कर लागणार असल्यामुळे जणू काही जुन्या मिळकतींवर करवाढीमध्ये मेहरबानी केल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. परंतु, जुन्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यात वाढ करण्याचे अधिकार नसल्यामुळे; किंबहुना अशी मिळकत पाडकामानंतर पुनर्विकासासाठी आल्यावरच त्या वर्षी असलेल्या सुधारित करयोग्य मूल्याचे दर लागू करण्याबाबत तरतूद आहे. एकीकडे नवीन मिळकतींना वाढीव कर लागणार असून जुन्या मिळकती त्यापासून दूर असल्याचे चित्र रंगवले जात आहे.

 

दरम्यान, १९८२ मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या नगरपालिकेच्या काळामधील जवळपास ४५ टक्के जुन्या मिळकती आजही शहरात उभ्या असल्याचे धक्कादायक वास्तव पर्यावरण विभागाच्या अहवालातून उघड झाले आहे. यातील अनेक इमारती-वाड्यांची स्थिती धोकादायक झाली असून त्यामुळे पुनर्विकासाशिवाय पर्याय राहिलेला नाही. सर्वसाधारणपणे स्थापत्यशास्त्राच्या नियमानुसार किंबहुना नगरचना विभागाकड़ून दरवर्षी ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित इमारतीची रहिवास क्षमता तपासली जाते. त्यासाठी महापालिकेतील खासगी स्ट्रक्चरल ऑडिट निश्चित केले असून त्यांच्याकडून रहिवाशांनी आपल्या मिळकतीचे ऑडिट करून घेणे अपेक्षित आहे. महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत तीन लाख २५ हजार २३५ इतक्या मिळकती मालमत्ता कराच्या रेकॉर्डवर आहेत. ६० वर्षांपेक्षा जुन्या २५ हजार १०२ मिळकती असून ४० वर्षे जुन्या २८ हजार ९७१ इमारती आहेत. १५ ते ४० वर्षांदरम्यान एक लाख ३ हजार मिळकती आहेत. १, ६३, ०२९ मिळकती १५ वर्षांखालील आहेत. त्यामुळे लवकरच यातील जुन्या इमारती पुनर्विकासावर येऊन त्यानंतर त्यांनाही नवीन करवाढ लागू होणार आहे. पुनर्विकासानंतर संबंधित इमारतींनाही नवीन करवाढ लागू होणार असल्यामुळे रहिवाशांनी आतापासूनच धसका घेतल्याचे चित्र आहे.


गावठाणातील ७७ हजार मिळकतींवर करवाढीचे संकट
गोदावरीच्या तीरावर असलेल्या पंचवटी व नाशिक पूर्व या विभागात सर्वाधिक जुन्या मिळकती आहेत. तेथे ६० व ४० वर्षे जुन्या इमारतींची संख्या ७० टक्क्यांहून अधिक आहे. नाशिक पूर्वमध्ये ४१ हजार २६८ इतक्या १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या इमारती असून त्यात ४० वर्षांपेक्षा अधिक जुन्या जवळपास २७ हजार इमारती आहेत. त्याखालोखाल पंचवटी विभागात ३३ हजार ९५० मिळकती असून तिथेही साधारण निम्म्या इमारती ४९ वर्षांपेक्षा जुन्या आहेत. सिडको ४४२७९, नाशिकरोड १४३८०, नाशिक पश्चिम ५९५७, सातपूर १६९८१ अशा १५ वर्षांपेक्षा अधिक वयोमर्यादा असलेल्या मिळकतींची संख्या आहे.

 

बातम्या आणखी आहेत...