आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तांविरुद्ध लढण्यासाठी आता भक्तांनीच एकत्र यावे; पणतू तुषार गांधी यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सध्या देश अतिशय नाजूक परिस्थितीत आहे, ज्या विचाराने राष्ट्र तयार  झाले त्यांनाच तडा जात आहे. महापुरुषांच्या भक्तांमध्येही इतके भेद आहेत, की भक्तांनी दोन महापुरुष किंवा दोन विचार एकमेकांचे शत्रू असल्याचे चित्र उभे केले आहे. अशा भक्तांविरुद्ध लढण्यासाठी आता भक्तांनीच एकत्र येण्याची गरज आहे. नुसता आदर्शवाद न शिकवता या बाबी लक्षात घेऊन राज्यकर्त्यांना आव्हान देण्याची वेळ आलेली आहे, असे प्रतिपादन तुषार गांधी यांनी केले. 


नाशिकच्या विचार जागर मंच व कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित तिसऱ्या ‘मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन’ कार्यक्रमाच्या उद््घाटनसत्रात ते बोलत होते. या वेळी तुषार गांधी यांच्यासह उत्तम कांबळे, डाॅ. रावसाहेब कसबे, डॉ. श्रीपाद जोशी, रामचंद्र जाधव, डॉ. मनीषा जगताप उपस्थित होते.  या वेळी गांधी म्हणाले, भारतीयांत फूट पाडणे इतके सोपे कसे, याचा विचार केला असता माझ्या लक्षात आले की, आपला वर्ण,  मत, आर्थिक स्तर, लिंग या सगळ्याच गोष्टीत भेद मानले जाते. हे भेद मोठे करण्यास भक्तांना वेळ लागत नाही, बापू म्हणजे महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद होते. मार्क्स, गांधी आणि आंबेडकर आज प्रासंगिक आहेत, कारण त्यांच्या काळातील सामाजिक प्रश्न आज १०० वर्षानंतर ही जैसे थे आहेत.


गांधींजींचे उपोषण आंबेडकरांच्या विरोधात नव्हते : रावसाहेब कसबे
डॉ. रावसाहेब कसबे हे ‘मार्क्स, गांधी आणि आंबेडकर’ या विषयावर बोलताना म्हणाले, मार्क्स आणि महात्मा गांधी हे हिंदुत्ववाद्यांचे मुख्य शत्रू आहेत. आजच्या परिस्थितीत महापुरुषांना मारण्यासाठीच भक्त निर्माण झाले आहेत. त्यांच्या भावनांशी खेळताना या भक्तांना स्वार्थच दिसत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही भारतातील पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी अल्पसंख्यांकांना वेगळा मतदार संघ देऊ नये, प्रौढ मताधिकार द्यावेत अशा मागण्या केल्या होत्या. गांधीजींचा उपोषणाचा पवित्रा हा अस्पृश्यता आणि सवर्णांच्या विरोधात होता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांंच्या विरोधात नाही. 


पुरुष घराबाहेर तर स्त्रिया घरात भांडतात : डॉ. शशिकला रॉय
‘मूलतत्त्ववादाच्या बळी महिला’ या विषयावर बोलताना डॉ. शशिकला रॉय म्हणाल्या, भारतीय स्त्रियांना अजूनही पितृसत्तेला बळी पडावे लागते. १९व्या शतकात स्त्रियांना सामर्थ्यवान आईच्या रुपात बघितले जात होते. स्त्रीचे स्त्री सोबत होणारे भांडण नैसर्गिक आहे. पुरुष घराच्या बाहेर व स्त्रिया घरात भांडतात. समर्पण, नैतिकता हे फक्त स्त्रियांवर लादले जातात. बलात्कार पुरुष करतात परंतु चारित्र्यहीन ह्या स्त्रिया होतात, हा चुकीचा न्याय आहे. असेही त्या म्हणाल्या.  

 

मूलतत्त्ववाद अापल्या अवतीभाेवती : राजन 

 

अन्वर राजन म्हणाले, कुठल्याही धर्माची स्थापना विनाकारण होत नाही. सुरुवातीच्या काळात धर्म मागासलेले होते, त्यावेळी समाजात विषमता होती. धर्माची चिकित्सा आहे तसे स्वीकारणे किंवा नाकारणे होत नाही.  धर्माची चिकित्सा ही त्या वेळेवर ठरत असते. मूलतत्ववादाची भूमिका नेहमी चुकीचीच असते असे नाही. गांधीजी धार्मिक होते परंतु मूर्तिपूजा करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. जगात अनेक धर्म आहेत परंतु हिंदू धर्मशिवाय असा एकही धर्म नाही जो आपल्याच धर्मातील लोकांना प्रवेश नाकारतो. असेही ते म्हटले. 

 

वर्चस्ववाद म्हणजेच मूलतत्त्ववाद : डाॅ. भालचंद्र कांगो

काॅ. डाॅ. भालचंद्र कांगो म्हणाले, वर्चस्ववाद म्हणजेच मूलतत्त्ववाद आहे. गेल्या ७० वर्षांपासून मार्क्स,  गांधी व डाॅ. अांबेडकर ह्या महानायकांना एकमेकांचे शत्रू ठरविले गेले. असे असते तर बाबासाहेबांनी मार्क्सची तुलना बुद्धांसोबत केली नसती. अस्पृश्यांसाठी गांधीजींनी राष्ट्रीय शाळा बांधल्या याचवेळी बाबासाहेब राष्ट्रीय पातळीवर वसतिगृह काढत होते. मूलतत्त्ववाद हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवतो. मार्क्सवाद हा मूलतत्त्ववादाला विरोध करतो. ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी लढणे हे कळत नकळत वर्चस्ववादच आहे. समाज बदलण्यासाठी जनक्रांती महत्त्वाची आहे.

बातम्या आणखी आहेत...