आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनई हत्याकांड; पुनर्जन्मावर विश्वास नाही, परंतु आरोपींचे कृत्य पाहून राक्षसांची आठवण होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘दुर्जन: कृती शिक्षभि, सज्जनो नैव जायते| अपि गंगाजल स्नानात, अर्ध केशया कुशायते ||’ या सुभाषिताप्रमाणे दुर्जनाला कितीही शिक्षा झाली तरी त्याचा सज्जन होत नाही आणि गंगेत स्नान केल्याने केस सरळ होत नाहीत.... या न्यायानुसार, सोनई हत्याकांडातील सर्व आरोपींना मृत्युदंडाचीच कठोर शिक्षा होणे व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. हा खटला म्हणजे वैयक्तिक मामला नाही, तर व्यापक सामाजिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाची घटना आहे. या क्रूर कृत्याने मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजामध्ये दहशत निर्माण केली. आजही आपल्या समाजात ‘जात’ एवढी खोलवर रुजलेली असणे ही शोकांतिका आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल, भविष्यातील मागासवर्गीयांवरील अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी,  न्याय आणि कायद्यावरील समाजाचा विश्वास प्रस्थापित करण्यासाठी या सर्व आरोपींना मृत्युदंड हाच पर्याय आहे.

   
जातीच्या दुराभिमानापोटी आरोपींनी मागासवर्गीय तरुणांची निर्घृण हत्याच केली नाही, तर त्या हत्येचा आनंदही घेतला ही क्रौर्याची परिसीमा आहे. स्वत:च्या जातीचा अभिमानच नाही, तर दुसऱ्याच्या मृतदेहाबद्दल त्यांनी दाखवलेला अनादर मानवी जीवनाचा अपमान आहे. केलेल्या कृत्याबद्दल आरोपींनी गेल्या पाच वर्षांत एकदाही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. इतकेच नाही, तर खोटे पुरावे उभे करून आणि मूळ पुरावे नष्ट करून यांनी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याचाही प्रयत्न केला आहे.   प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसले तरी २२ परिस्थितिजन्य पुराव्यांमधून या गुन्ह्याची क्रूरता आणि हेतू सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सिद्ध केला आहे. हे फक्त खून नाहीत, तर मागासवर्गीय तरुणांवरील अत्याचार आहे. ते तिघेही नि:शस्त्र होते, त्यांनी हिंसेस उद्युक्त केले नाही. आरोपींना केलेल्या कृत्याच्या परिणामाची पूर्ण कल्पना असल्याने अत्यंत विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी हे कृत्य केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपींचे वय किंवा त्यांच्या मानसिक स्थितीचा प्रश्नच उद‌्भवत नाही. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, परंतु आरोपींचे हे कृत्य ऐकून मला रामायणातील राक्षसांची आठवण होत आहे. आजही भूतलावर सैतान आहेत, याचा प्रत्यय या आरोपींच्या कृत्यातून येतो. सर्वोच्च न्यायालयाने अशा घटनांना थंड डोक्याने केलेले गुन्हे म्हटले आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन यास गोठलेल्या रक्ताने केलेल्या हत्या म्हणेन.’