आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनजमिनींवर हक्क सांगणारेच पेटवितात जंगलांमध्ये वणवे; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा अारोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वृक्षलागवडीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा राबत असताना वनांना आग लावत त्यांची मोठ्या प्रमाणावर हानी केली जाते. याला अनेक सामाजिक आशय असून, वनजमिनींवर हक्क सांगणारेच वनांमध्ये आगी लावतात, असा गंभीर आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी वनजमिनींवर आपली उपजीविका भागविणाऱ्या आदिवासींवर केला. आगामी पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीच्या तयारीसंदर्भात गुरुवारी (दि. १४) नाशिकमध्ये विभागीय आढावा बैठक झाली. त्यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी वनांच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययाेजना करण्याबाबत शासन अत्यंत गंभीर असून, चंंद्रपूर येथे 'वन वणवा अकादमी' स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. 


वाढत्या तपमानवाढीवर नियंत्रणासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकूण क्षेत्राच्या ३३ टक्के वनांचे क्षेत्र असावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यात ५० कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत गत दोन वर्षांत सात कोटी ४३ लाख वृक्षांची लागवड झाली असून, यंदाही १ ते ३१ जुलैदरम्यान १३ कोटी राेपांची लागवड केली जाणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यासह विभागास देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार वृक्षलागवडीची खड्डे खोदण्यापासून इतर सर्वच बाबींची कितपत तयारी झाली यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. त्यात प्रामुख्याने गत दोन वर्षांत राबविण्यात अालेल्या माेहिमेचे कौतुक करण्यात आले. परंतु केवळ अपेक्षेपेक्षा लागवड अधिक करून चालणार नाही, तर त्यातील किती वृक्ष जगले हे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. वृक्षारोपणाची ही मोहीम सर्वार्थाने यशस्वी होण्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी आणि लोकांचा प्रत्यक्ष सहभाग महत्त्वाचा आहे. वृक्षलागवड ही लोकचळवळ बनवून व्यापक स्वरूपात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ठरवून दिलेले उद्दिष्ट प्रत्येक जिल्हा कार्यालयाने पूर्ण करावे. त्याची सर्व माहिती ऑनलाइन अपलोड करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पडिक जमीन, गायरान, रिकामी जागा, ग्रामीण, शहरी भाग, गावांतील शेतांचे बांध, राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात यावी. यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, संघटना, शैक्षणिक, सामाजिक संस्था यांनीही पुढाकार घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. बैठकीला ३३ विभागातील अधिकारी, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


टोल फ्री नंबरद्वारे तक्रार दाखल करता येणार 
वनामध्ये आग, वन्यजीवांची अवैध कत्तल आणि इतर कुठल्याही चोरीच्या अथवा नियमबाह्य घटनांची माहिती देण्यासाठी शासनाने आता टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. १९२६ या क्रमांकावर काेणीही तक्रार केल्यास त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. शिवाय खबर देणाऱ्यास गुप्तरितीने बक्षीसही देणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 


चंद्रपूरला 'वन वणवा अकादमी', १२,५४८ गावांमध्ये समित्या 
वनांमध्ये वणवे पेटविल्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षांची, नैसार्गिक साधनसंपत्तीची अाणि वन्यजीवांची हानी होते. जंगलेची जंगलेच नष्ट होतात. उन्हाळ्यात नैगर्सिकरित्या वणवे पेटत असले, तरीही आता शासनाकडून कसत असलेल्या आदिवासींना जमिनी देण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांकडून ती पेटवून दिली जातात. वनजमिनींवर हक्क सांगणारेच वणवे पेटवतात. परंतु त्यावर नियंत्रणांसाठी आता चंद्रपूरला प्रतिबंधक 'वन वणवा अकादमी'च सुरू केली आहे. १२ हजार ५४८ गावांमध्ये संयुक्त वनसमिती स्थापनही केली आहे. त्यामुळे आपण शासन या मानवनिर्मित अागींवर नियंत्रण मिळवून शकणार असल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. 

 

वृक्षलागवडीस भाविनकतेची जाेड द्यावी: विकास खरगे 
गावात, परिसरात नागरिकांच्या घरातील आनंदाच्या महत्त्वाच्या प्रसंगामध्ये त्या -त्या घटनांची आठवण म्हणून वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. बाळाच्या जन्माची आठवण म्हणून जन्मवृक्ष, नोकरी, लग्न, पदोन्नती इतर आनंदी क्षणांची आठवण म्हणून आनंदवृक्ष, निधनामुळे दुरावलेल्या व्यक्तीची आठवण म्हणून स्मृतिवृक्ष या पद्धतीने प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा या वृक्षारोपणात सहभाग मिळाला तर या मोहिमेला भावनिकतेची जोड मिळेल, अशी अपेक्षा सचिव विकास खरगेंनी व्यक्त केली. 


राज्यात उभारतेय १ कोटी ग्रीन आर्मी 
वनसंरक्षणासाठी आणि वृक्षारोपण ही लोकचळवण होण्यासाठी राज्यात एक कोटी ग्रीन आर्मी तयार केली जात आहे. त्यासाठी ५१ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. उर्वरित ४९ लाख नोंदणीची प्रक्रिया सुरू असून त्यात सहभागी हाेण्याचे आवाहन यावेळी मुनगंटीवार यांनी या बैठकीमध्ये केले. 

बातम्या आणखी आहेत...