आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पुन्हा आंदोलन केल्यास पोलिस आम्हाला उचलतील : अरविंद बोरगुडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गेल्या वर्षीच्या १ जून रोजी नाशिकमधून शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. नैताळे, देवगाव, बोकडदरे गावातील आंदोलक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड झाली. काहींना पोलिसांच्या लाठ्यांचा मार खावा लागला. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी १५-१५ दिवस लपून राहावे लागले.

 

अखेरीस चोऱ्या आणि दरोड्यांचे गुन्हे अंगावर घेऊन, पुन्हा आंदोलन करणार नाही, अशा आशयाचे शपथपत्र दिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. आता वर्षभरानंतर पुन्हा किसान महासंघाने शेतकरी संपाची घोषणा दिली आहे. ‘पुन्हा आंदोलनात सहभागी झालो तर पोलिस आपल्यालाच आधी उचलतील,’ अशी धास्ती गेल्या वर्षीच्या आंदोलनात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या मनात आहे. या वेळी आंदोलनात सहभागी न होण्यामागची त्यांची भूमिका आणि कारणे ‘दिव्य मराठी’ने जाणून घेतली.  


‘इतकी आंदोलने झाली, मोर्चे झाले; सरकार फक्त आश्वासने देण्याचे नाटक करते, प्रत्यक्षात आमच्या हातात काहीच लागले नाही, फक्त मार तेवढा आम्ही खाल्ला. त्यामुळे या वेळी आम्ही या आंदोलनात सहभागी होणार नाही,’ नैताळे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि शिवसेनेचे निफाड विधानसभा संघटक अरविंद बोरगुडे सांगत होते. गेल्या वर्षीच्या १ जूनच्या आंदोलनावेळी त्यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. “वर्षभर कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही, असा बाँड आमच्याकडून लिहून घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलनात सहभागी झालो तर पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई करतील’, अशी  भीती त्यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली. ‘त्यानंतर आम्ही वीस दिवस घराबाहेर होतो. रात्री-अपरात्री पोलिस आमच्या घरी येेऊन कुटुंबीयांना त्रास देत होते. आंदोलनाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला, पण पोलिसांनी आमच्यावर खोटे गुन्हा दाखल केले तेव्हा कोणत्याच पक्षाचे नेते आले नाहीत,’ ही खंत त्यांनी व्यक्त केली.  


उद्धव ठाकरे आले, टोपी घालून आणि घेऊन गेले  
याच मुद्द्यावर नैताळे गावात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दौरा झाला. पण त्याचाही  काही उपयोग झाला नाही. उद्धव ठाकरे आले, आमची टोपी घेऊन गेले आणि आम्हालाही टोपी घालून गेले. आम्ही शिवसेना, भाजपचेच कार्यकर्ते आणि मतदार आहोत. भाजपसाठी मी बूथ कार्यकर्ता म्हणून काम केले, पण आता पश्चात्ताप होतो आहे, कारण दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे,’ रतन बोरगुडे सांगत होते.

 

कर्ज माफ झाले नाही, गुन्हा मात्र दाखल  
माझे ५ लाखांचे पीक कर्ज आहे. सरकारने दीड लाखाचे कर्ज माफ केले. बँकेचे पत्र आले की, आधी साडेतीन लाख भरा, मग दीड लाखाची माफी मिळेल. बँकेत जाऊन चौकशी केली तर यादीत माझे नावच नाही. असे असंख्य घोळ झाले आहेत. फक्त कर्जमाफीच नाही, तर त्या वेळी आमच्यावरील खोटे गुन्हेे मागे घेण्याचेही आश्वासन सरकारने दिले होते. पण तेदेखील पाळले नाही. वर्षभर आम्ही कोर्टात चकरा मारत आहोत.  
सदाभाऊ कोतकर, आंदोलक शेतकरी 

 

आताच्या आंदोलनात सरकारचे हस्तक  
गेल्या वर्षीचे आंदोलन कोणत्याही नेत्याने छेडलेले नव्हते. ते शेतकऱ्यांचे आंदोलन होते. या वेळी सरकारचे हस्तक आधीपासूनच त्यात घुसलेले आहेत. सरकारी कामांचा ठेका घेणारे त्याच्या आयोजनात आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच या वेळीही त्यांच्या माध्यमातून सरकार आंदोलन फोडणार आणि शेतकरी त्यात भरडणार जाणार म्हणून आम्ही त्यात सहभागी होणार नाही.  
बाबासाहेब गुजर, शेतकरी संघटना कार्यकर्ते

बातम्या आणखी आहेत...