आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेकाळलेल्या वळूच्या धुमाकुळात एकाचा बळी, सहा जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- बाजार समितीचे आवार आणि शहरातील वस्तीत मोकाट फिरणाऱ्या वळूने सोमवारी दुपारी एकच धुडगूस घालण्यास सुरुवात केल्याने लोकांची पळताभुई थोडी झाली. वावी वेस परिसरात जैन मंदिरानजीक वळूने समोर आलेल्या व्यक्तीस मारलेल्या काळमुसंडीत ही व्यक्ती सुमारे पंधरा फूट उंच हवेत उडून रस्त्यावर आदळून गतप्राण झाली. त्याची ओळख पटू शकली नाही. ही व्यक्ती परप्रांतीय कामगार असल्याचा अंदाज असून, त्याचा मृतदेह पालिका दवाखान्यात ठेवण्यात आला आहे. 


यानंतर वळूने पाच ते सहा जणांना जखमी केले. पैकी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एक भिकारी गंभीर जखमी झाला असून, उर्वरित जखमी खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल आहेत. ही घटना कळल्यावर एकच दहशत पसरली. वळूला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. पळापळ आणि पाठशिवणीच्या प्रकारात रात्री ८ च्या सुमारास हा वळू नरसिंह मंदिरानजीक कासट व देशमुख यांच्या घरामधील मोकळ्या मैदानात येऊन डरकावू लागला. एव्हाना आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, हेमंत वाजे, सहायक पोलिस निरीक्षक लोखंडे येऊन पोहोचले. आमदार वाजे यांनी वनखाते व पशुवैद्यकीय अधिकारी भणगे यांना पाचारण केले. जुन्या कोर्टाच्या आवारात प्रथम १० मिलिमीटरचा डोस असलेले भुलीचे इंजेक्शन वळूला देण्यात अाले. परंतु, त्याचा वळूवर काहीही परिणाम झाला नाही. शेवटी चार इंजेक्शन दिल्यानंतर नगरपालिका कर्मचारी, वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून वळूला दोऱ्या व फासामध्ये अडकवून त्याच्यावर रात्री उशिरा नियंत्रण मिळविण्यात यश आले. 

बातम्या आणखी आहेत...