आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्यातमूल्य रद्द होताच कांदा दरात 500 रुपयांनी वाढ; शेतकरी समाधानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- किमान निर्यातमूल्य रद्द होताच शनिवारी दुसऱ्याच दिवशी बाजार समितीत कांदा दरात क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ होऊन भाव २ हजार १०० रुपये झाला. केंद्राच्या निर्णयामुळे शेेतकऱ्यांत समाधानाचे चित्र होते. सोमवारी आवक वाढल्यास दर घसरण्याची शक्यता राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये नियाेजन करून कांदा विक्रीस आणल्यास दरात स्थिरता राहील. किरकाेळ बाजारात कांद्याची ३० रुपये किलाेने विक्री हाेत अाहे. 


किरकोळ बाजारात कांदा ८० रुपये किलो झाल्याने केंद्राने दर नियंत्रणासाठी डिसेंबरमध्ये निर्यातमूल्य लागू केले होते. त्यानंतर कांदा निर्यात थांबल्याने दरात घसरण होत गेली. त्यामुळे कांदा उत्पादकांत केंद्र सरकारविरोधात रोष निर्माण होऊ लागला होता. सुरुवातीला ८५० डाॅलर प्रतिटन निर्यातमूल्य करण्यात आले होते. त्यानंतर १५० डाॅलरने घट करीत ७०० डाॅलर करण्यात आले. दरम्यान, गुजरात, पुणे, चाकण, राजस्थान, पश्चिम बंगालमधून कांदा बाजारात येत असल्याने दरात घसरण झाली. ३ हजार ५०० रुपये दर असलेला कांदा १ हजार ६०० रुपये प्रति क्विंटलवर आला होता. निर्यातमूल्य रद्द करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पगार, जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी निवेदन देत आंदोलने केले. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा रोष अंगलट येऊ शकतो म्हणून २ फेब्रुवारी रोजी निर्यातमूल्य रद्द केले. 


दरात स्थिरता राहण्याचा अंदाज 
राज्यामध्ये रब्बी, लेट खरीपच्या कांदा लागवडीमध्ये गतवर्षापेक्षा २० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. गतवर्षी लेट खरिपामध्ये कांद्याची एक लाख ६ हजार हेक्टरवर लागवड होती. यंदा एक लाख २१ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. रब्बी कांद्याची लागवडही तीन लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर झाल्याने यंदा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे लाल आणि उन्हाळ कांदा दर एक ते दाेन हजार रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


हमीभावासाठी प्रयत्न व्हावा 
केंद्र सरकारने निर्यातमूल्य शून्य केल्याने आम्ही शेतकरी सरकारचे आभारी आहोत. मात्र, दरात घसरण होऊ नये म्हणून हमीभावासाठी प्रयत्न करावा. 
- भरोसा अहिरे, कांदा उत्पादक 


शेतकऱ्यांना फायदा 
किमान निर्यातमूल्य शून्य झाल्याने शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे. निर्यातीमध्ये वाढ होऊन दरात घसरण होण्याऐवजी स्थिरता राहणार आहे.
-नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड 


भाव स्थिर राहणार 
उन्हाळ कांदा वाढल्यास दरात घसरण होण्याची शक्यता राहील. परदेशी बाजारपेठेमध्ये पुन्हा भारतीय कांद्याचे वर्चस्व निर्माण होणार आहे. परंतु भविष्यात दर स्थिर राहतील. 
- विकास सिंग, निर्यातदार 


व्यापारासाठी चांगले दिवस 
लेटर आॅफ क्रेडिटचे बंधनदेखील केंद्र सरकारने काढल्याने लहान-मोठ्या निर्यातदारांना व्यापारासाठी चांगले दिवस राहतील. यामुळे कांदा निर्यात वाढून शेतकऱ्यांना दरवाढीसाठी याचा लाभ होईल. 
- प्रमोद गोरे, निर्यातदार 


विक्रीचे नियाेजन हवे 
कांदा आवक वाढल्यास निश्चित दरात घसरण होईल. मात्र, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी आणला तर दर टिकून राहतील. फायदा शेतकऱ्यांनाच होईल. 
- निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक 


पाकिस्तानचे वर्चस्व हाेणार कमी 
निर्यातबंदीमुळे यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याच्या मागणीत वाढ झाली होती. याचकाळात पाकिस्तानमध्ये किमान निर्यातमूल्य शून्य असल्याने तेथील निर्यातदारांनी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विक्री करून वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, आता भारतातून कांदा निर्यात होण्यास सुरुवात होताच पाकिस्तानचे वर्चस्व कमी होणार आहे. 


कांद्याचे भाव मार्चपर्यंत राहणार स्थिर 
लासलगाव :
कांदा निर्यातमूल्य शून्य झाल्यानंतर आता दराबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांत तीन हजार रुपयांनी विक्री हाेणारा लाल कांदा अावक वाढल्याने १५०० रुपयांवर येऊन ठेपला होता. त्यात निर्यातमूल्य शून्य केल्याने अाता मार्चपर्यंत कांद्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला अाहे.महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, अांध्र प्रदेश, कर्नाटकमधील कांदा बाजारपेठेत दाखल होऊ लागला असला तरी निर्यात सुरू हाेणार असल्याने भाव स्थिर राहण्याची शक्यता अाहे. 


लेटर आॅफ क्रेडिटचे बंधन हटविले 
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी किमान निर्यातमूल्य ८०० डाॅलर प्रति टन केले होते. लेटर आॅफ क्रेडिटदेखील बंधनकारक केले होते. त्यामुळे निर्यातदारांवर मर्यादा आल्या होत्या. केंद्र सरकारने आता लेटर अाॅफ क्रेडिटच्या (एलसी) बंधनातून मुक्त केल्याने सर्वच निर्यातदारांसाठी कांदा व्यापार खुला होणार आहे. परदेशी ग्राहकांना कांदा खरेदी सुलभ होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...