आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गंगापूर'च्या साठ्यात एका दिवसात 3% वाढ, गेल्या वर्षीपेक्षा केवळ तीन टक्के कमी पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शुक्रवारी व शनिवारी त्र्यंबक-इगतपुरीसह जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात तर एकाच दिवसात तीन टक्के पाणीसाठा वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी ३६ टक्के असलेला साठा आता ३९ टक्के म्हणजे २१७८ दशलक्ष घनफूट झाला आहे. समूहातील साठाही २५ टक्क्यांवरून २८ टक्के म्हणजे २८७६ दशलक्ष घनफूट झाला आहे.

 

यंदा पावसाने काहीसा कानाडोळा केल्यामुळे धरणांत गेल्या चार वर्षांतील नीचांंकी पाणीसाठा उरला आहे. सरासरी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिल्यानंतर प्रशासन, शेतकरी व सामान्य जनतेला हायसे वाटले होते. परंतु, मान्सून महाराष्ट्रासह जिल्ह्यात दाखल होण्यास काहीसा विलंब झाला. जिल्ह्यात तर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात हजेरी लावलेल्या मान्सूनमुळे बळीराजावर दुबार पेरणीचेही संकट अाले होते. परंतु, ताे उशिरा का हाेईना दाखल झाल्याने सर्वच सुखावले आहेत.


धरणांच्या साठ्यातही वाढ झाली आहे. दारणा दरणात दाेन टक्क्यांनी वाढ होत सध्या २८ टक्के म्हणजे २०३६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. मात्र, ताे गतवेळपेक्षा तब्बल ३० टक्के कमी आहे. परंतु, गंगापूर धरणात मात्र गतवेळपेक्षा अवघा तीन टक्केच कमी पाणीसाठा सध्या आहे. गेल्यावर्षी याच वेळी गंगापूर धरणात ४२ टक्के पाणी होते. यंदा ३९ टक्के इतके आहे. समूहातही गतवर्षी ३३ टक्के होते. यंदा २८ टक्के आहे. तरीही दमदार पावसाची नाशिककरांना प्रतीक्षा आहे.

 

बातम्या आणखी आहेत...