आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील कुख्यात गुन्हेगाराशी संबंधित मंदिरात साईबाबांच्या पादुका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- साईबाबांच्या पादुका दौऱ्यावरून शिर्डीत मोठे वादळ निर्माण झालेले असतानाच गुरुवारी अचानक साईबाबांच्या पादुका नागपूरला पोहाेचल्या. विशेष म्हणजे सरकारला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार मुन्ना यादव याचा निकटचा संबंध असलेल्या नागपूरच्या साई मंदिराच्या विश्वस्तांनी या पादुका दौऱ्याचे यजमानपद भूषवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे साई संस्थानचा हा नागपूर पादुका दर्शन दौरा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. 


साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षानिमित्त साईंच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने संस्थानने देशाच्या विविध भागांत साई पादुका दौऱ्याचे आयोजन केले आहे. गोवा, दिल्ली, गुजरातनंतर हा दौरा येत्या २५ जानेवारीपासून विदर्भात ठरलेला होता. मात्र, अचानक संस्थानने या दौऱ्यात बदल करून बुधवारी  सकाळी साईंच्या पादुका असलेला रथ नागपूरला रवाना केला.  बुधवारी संध्याकाळी नागपूरला आठ वाजेदरम्यान पोहाेचला. तेथे या रथाचे साईभक्तांनी वाजतगाजत स्वागत केले.  मात्र, यावेळी या दौऱ्याचे आयोजन नागपूरच्या वर्धारोडवरील साई मंदिराने केल्याचे समोर आले आहे. 


कुख्यात गुन्हेगार व पाेलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला मुन्ना यादव या मंदिराचा सर्वेसर्वा असल्याचे बोलले जात आहे. मुन्ना यादव प्रकरणावरून नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षांनी सरकारविरोधात रान उठवले होते. हे प्रकरण ताजे असतानाच राज्य सरकारच्या अधिपत्याखालील साई संस्थानच्या विश्वस्त मंडळाने मुन्ना यादवचा निकटचा संबंध असलेल्या मंदिराला साईपादुका दर्शन सोहळ्याचे आयोजनपद कोणाच्या सूचनेवरून दिले. यावरून चर्चेला उधाण आले आहे. 


विशेष म्हणजे या दौऱ्याचे निमंत्रण शिर्डीच्या ग्रामस्थांनाही देण्यात आले नाही. आजवरच्या सर्व दौऱ्यांत शिर्डी ग्रामस्थांना संस्थानकडून निमंत्रण दिले गेले. मात्र, नागपूरच्या दौऱ्याबाबत शिर्डी ग्रामस्थांनाही अंधारात ठेवले गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नागपूर पादुका दौऱ्याबरोबर जाण्यास साई संस्थानच्या सरकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही टाळले असल्याचे समजते. 
सर्व अधिकारी गुरुवारी दिवसभर त्यांच्या कार्यालयात कामकाजात मग्न होते. अधिकाऱ्यांचा या दौऱ्याला विरोध असल्याचे बोलले जात आहे. तर मग कोणाच्या आग्रहावरून या पादुका घाईघाईने नागपूरला पाठवण्यात आल्या? असा सवाल आता साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...