आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेच्या आदल्या रात्री 3 हजारांनी विकला पेपर; विज्ञान शाखेचा गणिताचा पेपर फुटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून शनिवारी होणाऱ्या विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाच्या ४० गुणांचा असलेला लिनियर अलजेब्रा (गणित) विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका तीन हजार रुपयांनी शुक्रवारी रात्रीच फुटली होती. त्याबाबत विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ होते. मात्र, यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.    


पुणे विद्यापीठाकडून परीक्षा सुरू होण्यापूर्वी अवघ्या दहा मिनिटांनी सर्व महाविद्यालयांना नेटवरून प्रश्नपत्रिका दिल्या जातात. मात्र, शनिवारी राज्यात सर्वत्र होणाऱ्या लिनियर अलजेब्रा (गणित) या विषयाची प्रश्नपत्रिका शुक्रवारी रात्रीच अकरा वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याबाबत आपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या हातात ही प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यांनी सत्यता पडताळून पाहण्यासाठी शनिवारी नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात प्राचार्य राम कुलकर्णी यांच्याकडे याबाबत चौकशी केली. कुलकर्णी यांनी त्वरित या विषयाची प्रश्नपत्रिका पडताळून पाहिली. त्या वेळी व्हायरल झालेली प्रश्नपत्रिका आणि विद्यार्थी सोडवत असलेली प्रश्नपत्रिका ही एकच असल्याचे दिसून आले. त्या वेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नको म्हणून नाशिक येथील पुणे विद्यापीठाच्या कार्यालयामध्ये जाऊन ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. प्रश्नपत्रिका फुटल्याचे शिक्षकांना माहिती झाल्यानंतर त्यांनीही पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. परंतु महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून हा पेपर सोडवून घेतला असून पुढे विद्यापीठ काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. याबाबत उपनगर पोलिसांनीही बिटको महाविद्यालयात धाव घेतली होती.   


विज्ञान शाखेच्या फिजिक्सचा पेपर फुटल्याची चर्चा 

 लिनियर अलजेब्रा या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचे माहिती होताच विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीही फिजिक्सची प्रश्नपत्रिका फुटली असल्याची चर्चा विद्यार्थ्यांत सुरू होती. 

 

केवळ दहा मिनिटांपूर्वी येते प्रश्नपत्रिका
प्रत्येक महाविद्यालयाला केवळ १० मिनिटांपूर्वी नेटवर प्रश्नपत्रिका येतात. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका महाविद्यालयातून फुटणार नाही. याबाबत आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. विद्यापीठच याबाबत निर्णय घेईल.
राम कुलकर्णी, प्राचार्य, बिटको महाविद्यालय   

 

प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय   
जे विद्यार्थी प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करून परीक्षेला सामोरे जातात त्यांच्यासारख्या विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होत आहे. विद्यापीठाने भविष्यात काळजी घेण्याची गरज आहे.
सचिन गोंदके, सामाजिक कार्यकर्ता   

 

बातम्या आणखी आहेत...