आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 किलाे प्लास्टिक जप्त; 3 लाख 60 हजार रुपये दंड पहिल्याच दिवशी वसूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्य शासनाच्या अादेशानुसार नाशिक महापालिकेने शनिवारी सुटीच्या दिवशीही विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा २००६ या अधिनियमानुसार प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर अाणि विक्री करणाऱ्या ७२ लाेकांकडून ३५० किलाे प्लास्टिक जप्त करून पहिल्याच दिवशी प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे तीन लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला. पालिकेच्या कारवाईमुळे धाबे दणाणलेल्या अनेक विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांची विक्री बंद केल्यामुळे मग नागरिकांचीही चांगलीच गैरसाेय झाल्याचे चित्र हाेते.

 

राज्य शासनाने २३ मार्च २०१८ राेजी प्लास्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना जारी केली. एप्रिलपासून प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू झाली. प्रारंभी पालिकेने प्लास्टिकबंदीचे नाशिककरांना आवाहन केले. व्यापारी व नागरिकांना त्यांच्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने सहाही विभागांत प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल वस्तू संकलन केंद्रे सुरू केली. मात्र, या केंद्रांना विक्रेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे बघून पालिकेने कारवाई सुरू केली. जवळपास ३१ टन प्लास्टिक जप्त करून पाच लाख १४ हजार ५०० रुपये वसूल केले आहेत. जप्त प्लास्टिक खत प्रकल्पावर प्रक्रियेसाठी नेण्यात अाले अाहे. दरम्यान, २३ जूनपासून राज्यभरात प्लास्टिकबंदीची कारवाई तीव्र झाली. शनिवारी सुटी असूनही पालिकेने कारवाई सुरू केली. सहाही विभागांसाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पथके स्थापन झाली हाेती. अतिरिक्त अायुक्त व अाराेग्यधिकाऱ्यांकडे त्यांचे नियंत्रण हाेते. विभागीय पथकांनी माेठ्या अास्थापनांकडे जाऊन प्लास्टिक जप्ती सुरू केली.

 

कर्मचाऱ्यांना अाेळखपत्राची सक्ती करा
प्लास्टिकबंदी कारवाईचा गैरफायदा घेण्याची शक्यता लक्षात घेत पालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व शासन निर्णय दाखविणे सक्तीचे करण्याबाबतचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी आयुक्त मुंढे यांना दिले अाहे. २३ जूनपासून प्लास्टिकी पिशवी वा प्लास्टिकचे साहित्य आढळले तर दंडात्मक कारवाई सुरू झाली अाहे. या पार्श्वभूमीवर, पालिकेचा कर्मचारी असल्याचे सांगून प्लास्टिकबंदीच्या नावाखाली व्यापारी व विक्रेत्यांची फसवणूक होण्याची भीती अाहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेचे अधिकृत ओळखपत्र दाखवणे सक्ती करावी अाणि दंड भरताना व्यापारी, विक्रेते व नागरिकांनीसुद्धा महापालिकेचा कर्मचारी आहे का याची खातरजमा करावी, असे अावाहन खैरे यांनी केले अाहे.

 

कारवाईचा दिखावाच; बड्यांवर हल्लाबाेल
शनिवारी जेमतेम ७२ जणांवर कारवाई झाली. सहा विभागाचा विचार केला तर, प्रत्येकी १२ केसेस करण्यात अाल्या. त्यात काही बड्यांवर कारवाईचा हल्लाबाेल करण्यात अाला. त्यात काही बड्या व्यापारी अास्थापनांचा समावेश अाहे. पहिल्यांदा प्लास्टिक अाढळल्यास प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड असून त्यानंतर दुप्पट दंड व फाैजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद अाहे.

 

या वस्तूंवर अाहे बंदी
पूर्वी ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीवर बंदी हाेती मात्र अाता सरसकट बंदी अाहे. केवळ दुधाच्या पिशव्या या पुनर्प्रक्रिया करून वापरणे बंधनकारक अाहे. दुधाच्या पिशव्या ग्राहकांनी विक्रेत्याला परत करणे अपेक्षित असून, पिशवी परत केल्यानंतर ५० पैसे ग्राहकाला देणे विक्रेत्याला बंधनकारक अाहे. अधिसूचनेनुसार थर्माकोल व प्लास्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या पिशव्या, ताट, कप, प्लेट्स, ग्लास, काटेचमचे, वाटी, स्ट्रॉ, नॉन ओव्हन पॉलिप्रॉपिलेन बॅग, पाऊच यांचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री तसेच आयात व वाहतूक करण्यास बंदी आहे.

बातम्या आणखी आहेत...