आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंढेंच्या कार्यकाळात अायुक्त निवासावर १६ लाखांचा बार, अार्थिक शिस्तीला तडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गरज, तांत्रिक व्यवहार्यता व तरतूद अशा त्रिसूत्रीच्या अाधारे अनेक लाेकाेपयाेगी कामांनाही ब्रेक लावणाऱ्या पालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांना रुजू झाल्यानंतर अवघे चारच महिने झाले असताना अायुक्त निवासस्थानावर पुन्हा 'तातडी' या नावाखाली १६ लाख रुपयांचा खर्च करण्याची धावपळ बांधकाम विभागाने सुरू केली अाहे. यापूर्वी गत तीन वर्षांत डाॅ. प्रवीण गेडाम व अभिषेक कृष्णा हे अायुक्त असताना १५ लाखांचा खर्च झाला असून, अायुक्त बदलीनंतर रंगरंगाेटीपासून तर चकाचक निवासस्थान करण्यासाठी हाेणाऱ्या खर्चाची परंपरा अार्थिक शिस्तीचे भाेक्ते मानल्या जाणाऱ्या मुंढे यांच्याही कार्यकाळात सुरूच असल्यामुळे अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. 


महापालिकेत जवळपास सव्वा वर्षापासून भाजपची सत्ता असून, या काळात जादा विषयात गरज नसताना काेट्यवधीचे काम घुसवल्याचे अाराेप झाले. सिंहस्थात चारशे काेटींचे तर मनसेच्या कार्यकाळात १९२ काेटी रुपयांचे रस्ते झाले असताना भाजपने २५७ काेटी रुपयांचे रस्ते करण्याचा प्रस्ताव जादा विषयात मंजूर केल्यामुळे भाजपची प्रचंड बदनामी झाली. शिवाय, सत्ताधाऱ्यांमधील टाेकाच्या भांडणात पक्षाची हाेणारी नाचक्की बघून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिस्तप्रिय व बेधडक अशी प्रतिमा असलेल्या मुंढे यांना ७ फेब्रुवारी राेजी नाशिक महापालिकेचे अायुक्त म्हणून सूत्रे दिली. त्यानंतर मुंढे यांनी धडाधड सत्ताधारी भाजपसह सर्वांचीच तरतूद नसलेली कामे रद्द करून टाकली. ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी कापून तर मुंढे यांनी पंखच छाटले. नगरसेवकांनी हा निधी लाेकाेपयाेगी व अचानक उद‌््भवणाऱ्या किरकाेळ कामांसाठी असल्याचे जीव ताेडून सांगितले. मात्र, अायुक्तांनी अशा पद्धतीची रचनाच रद्द करून टाकली. दरम्यान, अार्थिक शिस्तीचे पालन करणाऱ्या अायुक्तांच्याच निवासस्थानावर अाता १५ लाख रुपयांचा खर्च हाेत असल्याचे बघून नगरसेवकही हिशेब विचारण्याची तयारी करीत अाहेत. 


मुंढे हे रुजू झाल्यानंतर अचानक अायुक्त निवासस्थानावर कामांची अावश्यकता वाटू लागली अाहे. यापूर्वी कृष्णा यांच्याकडे निवासस्थान असताना त्यांच्या काळात जवळपास १३ लाख रुपयांची टप्प्याटप्प्याने कामे झाली अाहेत. त्यामुळे अाता १६ लाखांचा खर्च वादात सापडण्याची चिन्हे अाहेत. 


११ लाखांचे निव्वळ फर्निचरच हाेणार 
दाेन स्वतंत्र निविदा काढून कामे हाेणार असून, निव्वळ फर्निचरच ११ लाख ४८ हजार ६७६ रुपयांचे हाेईल. या कामासाठी ११ लाख ५३ हजार ५६४ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी हाेती. तडजाेडीत मक्तेदाराने ०.५० इतक्या कमी दराने काम करण्याची तयारी दाखवल्यामुळे पाच हजारांची बचत हाेऊन कामे दिली गेली. तर स्थापत्य कामात १० .९९ टक्के कमी दराची निविदा अाल्यामुळे सहा लाख १० हजार ७७० रुपयांच्या कामात जवळपास साठ हजार रुपयांची बचत हाेऊन हे काम पाच लाख ५१ हजार रुपयांत हाेणार अाहे. 


निवासस्थान अपुरे; फर्निचरपासून टाॅयलेटची कामे 
३१ मार्च राेजी कृष्णा यांनी निवासस्थान साेडल्यानंतर मिळकत व्यवस्थापकांनी पाहणी करून अहवाल दिला. त्यात निवासस्थानातील कॅम्प अाॅफिसमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे लक्षात अाले. त्यानंतर तातडीने अावश्यक कामाची यादीच तयारी करण्यात अाली. त्यात चार बेडरूममध्ये प्रत्येकी वाॅर्डराेब व बेडसेट, हाॅलमध्ये साेफासेट, स्टडी टेबल व फर्निचर पुरवण्याची शिफारस झाली. त्यानंतर पहिल्या मजल्यावर नवीन स्वतंत्र शाैचालय, संरक्षक भिंतीवर लाेखंडी फ्रेमद्वारे ग्रीन नेट करणे व अावश्यक स्थापत्य अर्थातच बांधकाम कामे प्रस्तावित अाहेत. याशिवाय नवीन ए.सी, टीव्ही बसवण्यासह विद्युत कामांची अावश्यकता व्यक्त झाली. 


कामाविषयी गाैडबंगाल; अाधी कामे, नंतर निविदा ? 
दरम्यान, विविध कामांसाठी ३१ मार्चनंतर अनेक दिवस अायुक्त निवासस्थान बंद हाेते. त्यामुळे येथील स्थापत्यविषयी कामे वा फर्निचर अाधी केले व त्यानंतर अाता देयके देण्यासाठी निविदा काढल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात अाहे. प्रथम विधानपरिषद निवडणुकीची अाचारसंहिता व त्यानंतर शिक्षक मतदारसंघाची अाचारसंहिता सुरू असल्यामुळे या कामाशी संबंधित मक्तेदारांना कार्यारंभ अादेश देता अालेले नाही. २९ मे राेजी अंतिम देकार उघडल्याची नाेंद अाहे. ही बाब बघता, बांधकाम विभागाने अायुक्तांना खुश ठेवण्यासाठी अाधी कामे व नंतर निविदा हा मार्ग तर वापरला नाही ना अशीही शंका घेतली जात अाहे. मात्र, त्याबाबत शहर अभियंता संजय घुगे यांना विचारले असता, त्यांनी अधिक माहिती घेऊन सांगताे असे उत्तर दिले. 

बातम्या आणखी आहेत...