आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: मुक्तता वाहनाद्वारे संकटग्रस्त मुलांचा प्रवास झाला सुखकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चाइल्डलाइन १०९८ या सेवेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांत नाशिकमध्ये अनेक मुलांना संकटातून सोडवून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. संकटात सापडलेल्या मुलांसाठी काम करताना अनेकवेळा अडचणींचाही सामना करावा लागतो. मुले संकटात सापडल्यास त्यांची मुक्तता करताना (रेक्स्यू) पोलिसांची तसेच पोलिस वाहनांची मदत घ्यावी लागत होती. पोलिसांच्या वाहनामुळे मुलांमध्ये भीतीही निर्माण व्हायची. या पार्श्वभूमीवर आता हिंदुस्थान पेट्रोलियम आणि चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक चाइल्डलाइनला मुक्तता वाहन (रेस्क्यू व्हॅन) देण्यात आल्याची माहिती चाइल्डलाइनचे संचालक महेंद्र विंचूरकर यांनी दिली. कल्पकतेने तयार केलेल्या या वाहनामुळे शहरातील मुक्तता केलेल्या मुलांचा प्रवास सुखकर होणार आहे. 


जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, नवजीवन वर्ल्ड पीस अॅण्ड रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुक्तता वाहनाचे बुधवारी (दि. १६) उद‌्घाटन करण्यात आले. शोषित, अनाथ, वंचित मुले संकटात सापडलेली असताना त्यांच्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे चाइल्डलाइन १०९८ ही राष्ट्रीय पातळीवर २४ तास चालणारी मोफत फोन सेवा कार्यरत आहे. 


नाशिकमध्येही गेल्या १५ वर्षांपासून ही सेवा कार्यरत असून या सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मुलांना निवासी व्यवस्था, वैद्यकीय मदत, शैक्षणिक मदत, विधी संघर्षग्रस्त मुले, बालविवाह अशा विविध प्रकारे संकटात सापडलेल्या मुलांसाठी चाईल्ड लाईनच्या माध्यमातून काम केले जात आहे. संकटकाळातून या मुलांची सुटका करताना पोलिसांची व त्यांच्या वाहनांची गरज पडत होती. पोलिसांची वाहने बघितल्यावर मुलांमध्ये भीती निर्माण होते. त्यामुळे या मुलांची सुटका करताना त्यांना मैत्रीपूर्ण, खेळकर वाटेल असे वाहन उपलब्ध करून देण्यात आल्याने आता यापुढे मुक्तता केलेल्या मुलांचा प्रवास सुखकर होणार आहे. यावेळी मंगल पवार, प्रीती कुलकर्णी, अरुण भालेराव, डिंपल पाटील, सुवर्णा शिंदेे, शीतल चव्हाण आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...