आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत निवृत्तिनाथ पालखीचा स्वागतखर्च शिवसेना करणार; नगरसेवक निधीचा करणार वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उच्च न्यायालयाचे अादेश व राज्य शासनाच्या पत्राचा संदर्भ देत संत निवृत्तिनाथ महाराज पालखी साेहळ्याच्या स्वागताच्या खर्चाला ब्रेक लावणाऱ्या महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांना शिवसेनेने गांधीगिरी पद्धतीने धक्का दिला असून, पक्षाच्या नगरसेवकांच्या मानधनातून स्वागत साेहळ्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला अाहे. शिवसेेनेने सत्ताधारी भाजपलाही खिंडीत गाठत विविध धर्मीयांची धार्मिकस्थळे ज्यांच्या सत्ताकाळात ताेडली गेली, त्यांच्याच उदासीनतेमुळे संत निवृत्तिनाथ महाराज पालखी साेहळा व रमजान ईदच्या साेहळ्यासाठी निधी दिला गेला नसल्याची टीकाही केली अाहे. 


महापालिकेत अाता नानाविध नियमांचा वापर करून प्रशासनाच्या साेयीचे काम मंजूर, तर गैरसाेयीच्या कामांना लाल कंदील दाखवला जात अाहे. त्याचाच एक भाग म्हणून संत निवृत्तिनाथ महाराज पालखी साेहळ्याच्या स्वागताचा खर्च, तसेच रमजान ईदच्या विशेष नमाज पठणासाठी पुरवल्या जाणाऱ्या साेयी-सुविधांसाठी हाेणाऱ्या खर्चाला कात्री लावली गेली. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या अादेशाचा व शासनाच्या परिपत्रकाचा संदर्भ दिला गेला; मात्र हे परिपत्रक ११ नाेव्हेंबर २०१७ राेजीचे अाहे. त्यानंतर अायुक्तांनी स्वत:च्याच अंदाजपत्रकात दाेन्ही कार्यक्रमांसाठी हाेणाऱ्या खर्चाचीही तरतूद केली. 


अाजवरची परंपरा बघता दाेन्ही साेहळ्यांसाठी खर्चास परवानगी देण्याची मागणी करीत तसे न झाल्यास शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेने स्वखर्चातून साेहळा करण्याची तयारी दाखवली हाेती. महापाैर रंजना भानसी यांनीही अायुक्तांना खर्च करण्याची मागणी केली; मात्र अायुक्तांनी ती धुडकावून लावली हाेती. त्यानंतर पालखी साेहळा स्वागत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 'खर्च करू नका, निदान स्वागताला तरी या', असे निमंत्रणही दिले हाेते.


खर्चाबराेबरच जाेरदार स्वागतही करणार 
विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी मानधनातून स्वागत साेहळ्याचा खर्च करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक व धार्मिक भावना जाेपासण्याचे काम शिवसेना करीत असून इतक्या वर्षांची स्वागताची परंपरा खंडित हाेऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे बाेरस्ते यांनी बैठकीत स्पष्ट केले. साेबत, भाजपला झटका देत त्यांच्या काळात विविध धर्मीयांच्या श्रद्धास्थानांना कसा धाेका पाेहाेचला याकडे लक्ष वेधले. दरम्यान, केवळ निधीच खर्च नव्हे तर स्वागत साेहळ्यासाठी पक्षाचे खासदार, अामदार व अन्य पदाधिकारी व नगरसेवकही उपस्थित राहणार अाहेत. गटनेते विलास शिंदे यावेळी उपस्थित हाेते. 

बातम्या आणखी आहेत...