आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५ रुपये किलाे दराच्या १७४० क्विंटल तूरडाळीची विक्री सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक तालुका आणि मालेगाव धान्य वितरण कार्यालयास प्रथम प्राप्त झालेली ३५ रुपये किलोची तूरडाळ आता संपूर्ण जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहे. १ हजार ७४० क्विंटल तूरडाळ पुरवठा विभागास मिळाली असून, शहर आणि जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून मंगळवार (दि. ३)पासून या डाळीचे वाटपही सुरू झाले आहे. 


राज्यात गतवर्षी तूरडाळीचे उत्पादन अधिक झाले. त्यामुळेच सरकारने हमीभावाने ही डाळ खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांकडून घेतलेली ही डाळ सर्वसामान्यांना ३५ रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यासाठी पुरवठा विभागाने १७४० क्विंटल डाळीची मागणी केली होती. त्यानुसार सरकारकडून सोमवारी (दि. २) ही डाळ उपलब्ध झाली. दरम्यान, जिल्ह्यातील २ हजार ६०८ स्वस्त धान्य दुकानांमधून ही डाळ नागरिकांना मिळणार आहे. गतवर्षी तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. 


खुल्या बाजारात एक किलोसाठी नागरिकांना १४० रुपये मोजावे लागत होते. दरवाढीने सर्वसामान्यांच्या ताटातून वरणभात गायब झाला होता. त्यावेळी सरकारने डाळीची कोंडी फोडण्यासाठी ८५ रुपये किलो दराने डाळ रेशनवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शेवटपर्यंत ही डाळ उपलब्ध झाली नाही. परिणामी नागरिकांचा हिरमोड झाला. 
यंदाही ३५ रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानांमधून डाळ देण्याची घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी एप्रिल महिन्यात केली. मात्र, गत तीन महिन्यांत दुकानदारांनी मागणी नोंदवूनही सरकारकडून डाळ उपलब्ध होत नव्हती. उलटपक्षी अगोदरची ५५ रुपये किलोची डाळ विक्री करा, त्यानंतरच पुढील तूरडाळीची मागणी करा, असा तोंडी फतवा राज्य सरकारने दिला हाेता. त्यामुळेच पुरवठा विभागासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली होती. दरम्यान, जिल्ह्यासाठी आता डाळ उपलब्ध झाल्याने ही डाळ तत्काळ स्वस्त धान्य दुकानांमध्ये पाठविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे नागरिकांना रेशनवर स्वस्तातील तूरडाळ मिळण्यास सुरुवात झाली आहे. 


कार्डधारकांना मिळणार प्रत्येकी १५ किलो 
राज्य शासनाने जिल्ह्याला पाठविलेली तूरडाळ ही स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध करण्यात अाली अाहे. सध्या रेशनवर मिळणारी तूरडाळ पॉलिश नसलेली आहे. ही तूरडाळ अंत्याेदय रेशनकार्ड, केशरी रेशनकार्डसह पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ही उपलब्ध करण्यात येणार अाहे. दरम्यान, महिन्याकाठी स्वस्त धान्य दुकानांमधून प्रत्येक कार्डधारकाला पंधरा किलोपर्यंत ही तूरडाळ नागरिकांना मिळणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...