आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडे गुरुजी यांची आज सभा, वाहतूक मार्गात बदल; यंत्रणा सतर्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - संभाजी भिडे गुरुजींच्या सभेसाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, रविवारी (दि. १०) रविवार कारंजा परिसरात होणाऱ्या सभेसाठी पोलिस यंत्रणेकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी होणाऱ्या सभेसाठी अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्ग बंद करण्यात आला अाहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची पूर्वनियाेजित सभा रविवारी होत आहे.

 

पोलिस प्रशासनाकडून या सभेला परवानगी देण्यात अाली असली, तरी या सभेत कुठल्याही प्रक्षोभक आणि आवेशपूर्ण भाषण करण्यास पोलिसांनी सक्त मनाई केली आहे. १५ जूनपर्यंत शहरात मनाईहुकूम आदेश काढण्यात आला आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सभा परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार अाहे. अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या रस्त्यावर सकाळी १२ ते रात्री १२ या वेळात सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावर जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले.

 

अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात
भिडे गुरुजी भीमा-कोरेगाव जातीय तणावाला कारणीभूत असल्याचा आरोप करत काही संघटनांनी या सभेला परवानगी नाकारावी यासाठी जिल्हाधिकारी अाणि पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर सभेच्या ठिकाणी १० निरीक्षक, ३० उपनिरीक्षक, १५० कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, स्ट्रायकिंग फोर्स, क्यूआरटी आणि साध्या वेशातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपआयुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहायक आयुक्त अशोक नखाते, डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, सचिन गोरे यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक बंदाेबस्तात सहभागी होणार आहेत.

 

वाहतूक मार्गात बदल असा
अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्गावरील एस.टी. बसेससह सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला असून पेठे हायस्कूल, हेमलता टॉकीजकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी, म्हसोबा लेनकडून हेमलता टॉकीजकडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी, गाडगीळ लेनकडून हेमलता टॉकीजकडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना, शनि गल्लीकडून हेमलता टॉकीजकडे जाणाऱ्या-येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात अाला अाहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...