आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वळण रस्ता, तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी सेनेचा 'ठिय्या'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा- सटाणा शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांचे अपघातात बळी गेलेले आहेत. तालुक्याचे तहसीलदारपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त असल्याने सर्वसामान्य जनता, विद्यार्थी व पालकांचे शासकीय दाखले मिळत नसल्याने हाल होत आहेत. शासनाने त्वरित तहसीलदारांची नियुक्ती करावी व वळण रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी बागलाण तालुका व शहर शिवसेनेतर्फे मंगळवारी (दि. ३) तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडून निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाकडून लवकरच तहसीलदारांची नियुक्ती होईल. तसेच वळण रस्त्याच्या मागणीचे निवेदन वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे आश्वासन प्रांताधिकारी प्रवीण महाजन यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 


सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर -प्रकाशा राज्य महामार्गावर दररोज अपघात होत असल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. हा वळण रस्ता व्हावा, या मागणीचे निवेदन देण्यासाठी सकाळी अकरा वाजता शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तहसील कार्यालयात आले. मात्र यावेळी तहसीलदार व नायब तहसीलदार जागेवर नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासनविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलनाची माहिती मिळताच बागलाणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महाजन व पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील हे तत्काळ तहसील कार्यालयात पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाजन यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 


आंदोलनात उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे शरद शेवाळे, मुन्ना सोनवणे, युवासेना शहरप्रमुख सचिन सोनवणे, राजनसिंह चौधरी, अमोल पगार, शेखर परदेशी, महेश सोनवणे, निरंजन बोरसे, बापू कर्डीवाल, पप्पू शेवाळे, भाऊसाहेब नांद्रे, प्रवीण सोनवणे, भैय्या सूर्यवंशी, विक्रम पाटील, राजू जगताप, मंगलसिंग जोहरी, रवींद्र सोनवणे, सागर पगार, दत्तू सातव, दुर्गेश विश्वंभर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. 


तहसीलदारपदी खरमाळेंची नियुक्ती 
शासनाने वंदना खरमाळे यांना बागलाणच्या तहसीलदारपदी नियुक्तीचे आदेश दिले असून लवकरच त्या रुजू होतील. तसेच वळण रस्त्याप्रश्नी मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून तोडगा काढण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले 

बातम्या आणखी आहेत...