आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे जप्तीस स्थगिती देत मुख्यमंत्र्यांचाच मुंढेंना दणका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दत्तक नाशिक सुधारणेसाठी अायुक्त म्हणून पाठवलेल्या तुकाराम मुंढे यांनी सत्ताधारी भाजपलाच एकापाठाेपाठ एक झटके देण्याचे तंत्र सुरू ठेवल्यानंतर अाता सन २०१५ ते २०१७ या कालावधीतील गाळ्यांचे भाडे थकबाकीवरून सुरू असलेल्या जप्तीच्या कारवाईला स्थगिती देत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मुंढेंना दणका दिला अाहे. महापालिकेने रेडीरेकनरनुसार थकीत असलेल्या तीन वर्षांतील थकबाकी न भरलेले ११०० गाळे जप्त करण्यासाठी नाेटिसा पाठवल्यानंतर भाजप अामदार सीमा हिरे यांनी तत्काळ ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: मुंढेंना फाेन करून गाळेधारकांसाठी नवीन नियमावली केली जाणार असल्यामुळे तूर्तास दुकाने सील वा जप्तीची कारवाई स्थगित करावी, असे अादेश दिल्याचे हिरे यांनी सांगितले. 


महापालिकेच्या अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढेंनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या बेलगाम कारभाराला सुरुंग लावला. पहिल्याच महासभेत १३ काेटी रुपयांची ३२ कामे रद्द केली. त्यानंतर प्रभाग समित्यांपासून तर स्थायी व महासभेपर्यंत अनेक विकासकामांना गरज, तांत्रिक व्यवहार्यता अाणि तरतूद या त्रिसूत्रीच्या अाधारे ब्रेक लावला. त्यामुळे भाजपचे सर्वाधिक नगरसेवक अस्वस्थ झाले. नेमके मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना भाजपची सत्ता साम्राज्य वाढवण्यासाठी पाठवले की, पतनासाठी असाही सवाल त्याच उद्विग्नतेतून नगरसेवक करून लागले. त्यानंतर मुंढेंनी पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांच्या थकबाकीचा मुद्दा रडारवर घेतला अाहे. 

 

महापालिकेच्या व्यापारी संकुलात जवळपास दाेन हजार गाळेधारक असून, त्यातील ११०० गाळेधारकांकडे माेठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे ती ३१ मार्चपर्यंत न भरल्यास गाळे जप्तीची कारवाई सुरू हाेती. मात्र, त्यास गाळेधारकांनी अाक्षेप घेत २०१५ ते २०१७ या कालावधीत रेडीरेकनरनुसार लागू झालेले भाडे अमान्य असल्याचे कारण देत थकबाकी भरण्यास नकार दिला हाेता. अामदार हिरे यांच्यासमवेत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडेही बैठक हाेऊन महापालिकेचे गाळे असल्यामुळे महासभेने निर्णय घेऊन सुसह्य दर लागू करावे व त्याप्रमाणेच भाडेवसुली करावी, अशा सूचना पाटील यांनी दिल्याचे हिरे व महापाैर या दाेघांनी सांगितले हाेते. त्यानुसार महापाैरांनी महापालिकेत सर्वपक्षीय बैठकही घेतली हाेती. त्यात गाळेधारकांना सुसह्य भाडे अाकारणीचा निर्णय झाला हाेता. मात्र, त्यानुसार दरनिश्चिती हाेण्यापूर्वीच तत्कालीन अायुक्त अभिषेक कृष्णा यांची बदली हाेऊन त्यांच्या जागी मुंढे यांची नियुक्ती झाली. मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अाता सर्वच वसुलीसाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाळेधारकांना थकबाकी न भरल्यास जप्तीच्या नाेटिसा पाठवल्या अाहेत. 

 

दरम्यान, त्याविराेधात गाळेधारकांचा राेष लक्षात घेत व भाजपच्या व्हाेट बँकेला त्यातून धक्का पाेहाेचेल या भीतीने तत्काळ अामदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान धाव घेतली. गाळेधारकांचा प्रश्न सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना तत्काळ फाेन करून थकबाकीदार गाळे सील करून जप्त करू नये, असे अादेश दिल्याचे हिरे यांनी सांगितले. 

अाजपर्यंत मुंढे यांनी राजकीय दबाव झुगारून लाेकहिताची कामे केल्याचे चित्र अाहे. नियमानुसार २०१४ पासून गाळेधारकांची थकबाकी वसूल करणे व न भरल्यास त्यांच्याकडील गाळे जप्त करण्याची बाब याेग्यच अाहे. मात्र, अाता मुख्यमंत्र्यांनीच त्यांना दूरध्वनी करून कारवाई स्थगितीबाबत अादेश दिल्यामुळे अाता त्याचे पालन करणे महत्त्वाचे की अाजपर्यंत जपलेली स्वत:ची प्रतिमा, असाही प्रश्न त्यांच्यासमाेर असेल. एकूणच 'इकडे अाड तिकडे विहीर' असाच पेच मुंढे यांच्यासमाेर असल्याचे चित्र अाहे. यासंदर्भात मुंढे यांची प्रतिक्रीया विचारला असता, त्यांच्याकडून काेणतेही उत्तर मिळू शकले नाही. 

 

नियमावली तयार हाेईपर्यंत कारवाईला स्थगिती 

गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार लागू झालेली भाडेवाढ व थकबाकी मान्य नसल्यामुळे शासनाकडे पाठपुरावा सुरू अाहे. त्यातून गाळे भाडेवाढीसाठी नियमावलीची मागणी केली हाेती. त्यानुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी नियमावली तयार हाेईपर्यंत गाळे जप्तीच्या कारवाईला स्थगिती देण्याचे अादेश अायुक्त मुंढे यांना फाेनद्वारे दिले अाहेत. - सीमा हिरे, अामदार, भाजप 

बातम्या आणखी आहेत...