आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस लागल्याचे सांगत गंडा घालणाऱ्या टोळ्या अटकेत; दिल्लीत १५ दिवस सर्च ऑपरेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बक्षीस लागल्याचे सांगत महिलेसह नागरिकांना गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. पंधरा दिवस पथकाने दिल्लीत तळ ठोकत हजाराे हजार कॉल सेंटरची माहिती घेत सहा संशयितांना अटक केली. यात एका तरुणीचा सहभाग आहे. सायबर पोलिसांची ही पहिलीच कारवाई ठरली आहे. 


स्मिता पाटील यांना फोन करून इटिऑस कार बक्षीस लागल्याचे आमिष देत बँक पेटीएम खात्यावर एक लाख ९१ हजारांची रक्कम भरण्यास सांगत फसवणूक केली होती. सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे सर्व कॉल दिल्लीमधून आल्याची माहिती मिळाली. तपासात 'वर्ल्ड शॉप', शॉप बाय सिलेक्ट डॉट. कॉम, प्लूटकार्ड या कंपन्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली हाेती. नाव पत्ते ओखला इंडस्ट्रियल सेक्टर नंबर ३ येथील असल्याची माहिती मिळाली. या कंपन्यांचा मालक एकच असल्याचे दिसले. पथकाने नोएडा पोलिसांच्या मदतीने छापा टाकत मालक शत्रुघ्नकुमार बिंदेश्वर राय, प्रकाश सिद्धार्थ सोनटक्के, आकाश श्यामकुमार गुप्ता, मोबीन महम्मद अस्लम (सर्व रा. दिल्ली) यांना अटक केली. कॉल सेंटरमधून १६ मोबाइल, ११ हार्ड डिस्क, तीन लॅपटॉप, स्टॅम्प, शिक्के, मोडेम, असा एक लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. शुक्रवारी (दि. १३) संशयितांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ निरीक्षक देवराज बोरसे, दीपक देसले, किरण जाधव, भूषण देशमुख, नितीन निकम, प्रदीप वाघ, दीपाली नेटके, श्यामल देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाचे पोलिस आयुक्त डॉ. सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांनी अभिनंदन केले. 


बंटी-बबली अटकेत 
पथक दिल्लीमध्ये असताना सायबर पोलिस ठाण्यात दाखल नीलेश मंडलिक यांनाही www.kehty.com ऑनलाइन शॉपिंग साइटवरून अमेझ कार लागल्याचे सांगत ऑनलाइन चार लाख ७४ हजारांना गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. पथकातील श्यामल जोशी, दीपाली नेटके यांनी कॉल सेंटर कर्मचारी बनून वसंतविहार (दिल्ली) येथे संशयित सुनीता गोवर्धन नेगी, सय्यद रझा महम्मदअली हुसेन झैदी यांचा माग काढत पथकाला कळवले. दोघांना वसंतविहार पोलिसांच्या मदतीने अटक केली. 


सतर्कता पाळणे आवश्यक 
ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तूवर बक्षीस लागल्याचे सांगितले जाते. असे फोन आल्यानंतर सतर्क व्हावे. आमिष देत पैसे भरण्यास सांगत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. फसवणूक टाळावी. अशा प्रकारे कुणाची फसवणूक झाली असल्यास संपर्क साधावा. -देवराज बोरसे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे 


शॉपिंग कंपन्यांकडून मिळतो डाटा 
देशात विविध ऑनलाइन शॉपिंग कंपनीमध्ये कोट्यवधी ग्राहक ऑनलाइन खरेदी करतात. हा डाटा संशयित कंपनीकडून अवैध पद्धतीने विकत घेतात. याद्वारे खरेदी केलेल्या ग्राहकाची सर्व माहिती मिळते. खरेदी केलेल्या वस्तूचे वर्णन सांगत खरेदीवर बक्षीस लागल्याचे सांगितले जाते. येथेच ग्राहक फसतो. जाळ्यात आलेल्या ग्राहकाला ऑनलाइन रक्कम भरण्यास सांगत गंडा घातला जातो. संशयितांनी महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिणेतील नागरिकांचा डाटा घेत गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. 


कर्मचारी झाले कॉल सेंटर 
वरिष्ठ निरीक्षक बोरसे यांनी मुलाला आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे नाटक करत परिसरात वास्तव्य केले. पथकातील कर्मचाऱ्यांनी संशयित कॉल सेंटरवर नजर ठेवली. तब्बल चार ते पाच कॉल सेंटरची माहिती आठ दिवसांत काढत संशयिताचा माग काढला. विशेष म्हणजे पोलिस असल्याची भनक संशयितांना लागू न देता ही विशेष कारवाई केली. 

बातम्या आणखी आहेत...