आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'संजू\'च्या कथानकात \'फॅक्ट\' काय आणि \'फिक्शन\' काय?; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे काही प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नेता आणि अभिनेता या दोन्ही भूमिकांत यशस्वी ठरलेल्या पित्याचा भरकटलेला मुलगा आणि चुकीचे निर्णय घेत गेल्याने अडकत गेलेले, बहुपेडी आयुष्य जगलेल्या नायकामुळे अभिनेता संजय दत्तबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यात ‘संजू’ हा चित्रपट यशस्वी ठरला असला तरी, यातील “फॅक्ट’ काय आणि ‘फिक्शन’ काय याबद्दल लोकांच्या मनात बरीच उत्सुकता आहे. या निमित्ताने संजय दत्तविरोधातील खटला लढवलेले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून जाणून घेतलेली प्रत्यक्ष खटल्यातील वस्तुस्थिती आणि चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी उपस्थितीत केलेले हे प्रश्न...

 

सात हँडग्रेनेड्स चित्रपटाच्या कथानकातून का लपवले ?  
‘मला आणि वडिलांना धमकी आल्यानंतर मी स्वसंरक्षणाकरिता एके ५६ रायफल घरात ठेवली होती’ ही आरोपीची गुन्ह्यातील कबुली या चित्रपटात दाखवली असून हे वास्तव आहे. परंतु या खटल्यादरम्यान पुढे आलेल्या पुराव्यांनुसार, १२ मार्च १९९३ आधी मुंबई बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी अबू सालेम एका टेम्पोमधून हँडग्रेनेड्स आणि रायफल घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता, त्यातून त्याने ५ एके ५६ रायफल्स व ७ हँडग्रेनेड्स  काही दिवस त्याच्या घरात ठेवल्या हे या चित्रपटात का लपवण्यात आले?  काही दिवसांनंतर एक रायफल संजय दत्तने स्वत:कडे ठेवून बाकीच्या सालेमला परत केल्या, हे का दाखवले नाही. चरित्र चित्रपटात वास्तव गोष्टींचा उल्लेख असणे अपेक्षित असताे की गुन्ह्यावर पडदा टाकून सहानुभूती मिळवायचे असते, हे निर्माता, दिग्दर्शकांना समजू नये, हे या चित्रपटाचे दुर्दैव.


कयूमकडून घेतलेल्या पिस्तुलाचे काय?  
टाडा कायद्यातील तरतुदींनुसार विनापरवाना संहारक शस्त्र  ठेवणे हा गुन्हा संजय दत्तने केला होता. परंतु, न्यायालयाने या गुन्ह्यात त्यास दोषमुक्त केले आणि बेकायदा शस्त्रास्त्र कायद्याखाली शिक्षा ठोठावली. त्यावेळी चांगल्या वर्तणुकीच्या बॉण्डवर आपल्याला सोडावे ही विनंती त्याने केली होती. त्याच्या कबुलीजबाबानुसार, दाऊदचा शार्प शूटर कयूमकडून संजयने विनापरवाना पिस्तूल घेतल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला बॉण्डवर सोडू नये, असा आक्षेप सरकारी पक्षाने घेतला होता. परंतु, कयूमकडून घेतलेल्या या पिस्तूलचा उल्लेखही चित्रपटात नाही.

 

पोलिस संरक्षणाचा दावा करण्यामागे उद्देश काय?
वडील खासदार असल्याने संजयच्या घरी पोलिस संरक्षण होतेच. मग, संरक्षणाच्या नावाखाली ‘एके ५६’ बाळगणे हा भाबडेपणाचा बचाव आहे की त्यामागे दुसरा काही उद्देश होता, हे चित्रपटात दाखवणे आवश्यक होते. बॉम्बस्फोटापूर्वी अशी शस्त्रे व हँडग्रेनेड्स घेऊन सालेम आला होता. ही बाब संजयने पोलिसांना कळवली असती तर निरपराध २५६ लोकांची हत्या टाळता आली असती. याबद्दल त्याला आता काय वाटते, हेही चित्रपटात दाखवायला हवे हाेते.

 

‘दहशतवादी’ नसल्याचे कोर्टाचेच ताेंडी प्रमाणपत्र  
कोणत्याही खटल्यात न्यायालय दोषी किंवा निर्दोष, एवढाच निकाल देते. संजय दत्तच्या खटल्यात मात्र ‘तू दहशतवादी नाहीस’ असे ताेंडी प्रमाणपत्र देण्याची घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली. त्याचा पुरेपूर फायदा चित्रपट निर्मात्याने या चित्रपटात करून घेतला. संजय दत्तच्या घरी आरडीएक्स ठेवण्यात आले होते, असा आरोप पोलिसांनी कधीही केला नव्हता, परंंतु त्याचेही मीडियाच्या नावाने या चित्रपटात भांडवल करून सहानुभूती प्राप्त करून घेतली आहे.

 

सहानुभूती मिळवण्यात यशस्वी  
मानसशास्त्रातील अभ्यासक सांगतात, की एखादा गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटला किंवा जामिनावर बाहेर आला तरी तो आपण गुन्हाच केल्या नसल्याचा आभास जनमानसात निर्माण करून आपल्या प्रती जनतेेची सहानुभूती मिळवण्यात यशस्वी होतो. याच मानसशास्त्राच्या आधारे चित्रपट निर्मात्याने सदर अभिनेत्याबद्दल सामान्य जनमानसात सहानुभूती मिळवून दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...