आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनई हत्याकांड; रक्तबंबाळ विळा, मोबाइलचे लोकेशन आणि 53 साक्षीदारांची तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सबळ परिस्थितजन्य पुरावा, ५३ साक्षीदारांच्या साक्षी, पाेलिसांनी हस्तगत केलेला रक्तबंबाळ विळा आणि मोबाइलचे लोकेशन हे या खटल्यातील कळीचे मुद्दे ठरले. मात्र मोबाइल लोकेशन आणि दांड्याचे रासायिक विश्लेषण न झाल्याने त्याचा लाभ मिळून फालकेची निर्दाेष मुक्तता झाली. 


या खटल्याचा प्राथमिक तपास झाल्यानंतरही महत्त्वाचे दुवे प्राप्त हाेत नसल्याचा मृतांच्या नातलगांनी अाराेप केल्याने तत्कालीन पाेलिस अधीक्षक व गृह विभागाने त्याची दखल घेत तपास शेवगाव विभागाचे तत्कालीन पाेलिस अधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्याकडे साेपवला हाेता. त्यांनी घटनास्थळासह मृतांचे पंचनामे करीत जवळपास ३०० पानांचे दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल केले हाेते. तरीही गुन्ह्याचा तपास नि:पक्षपातीपणे केला जात नसल्याचा अाराेप मृतांच्या नातलग व सामाजिक संघटनांनी केला हाेता. त्यातच नेवासा न्यायालयातून हा खटला नाशिक न्यायालयात वर्ग करण्याचा अाैरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिल्यानंतर पुन्हा या गुन्ह्याचा स्वतंत्र तपास राज्य गुन्हा अन्वषेण विभाग(सीअायडी क्राइम)कडे साेपवण्यात अाला हाेता. तत्कालीन उपअधीक्षक साेपान बांगर यांच्याकडे तपास साेपवल्यानंतर त्यांनीही नव्याने साक्षीदार व पुरावे मिळवत जवळपास हजार पानांचे दाेषाराेपपत्र तयार करून न्यायालयात दाखल केले. या दाेन्ही अधिकाऱ्यांची साक्षही न्यायालयात महत्त्वाची ठरली.

 

न्या. वैष्णव यांनी आरोपींना पुढे बोलावले आणि सांगितले..
‘तुमच्याविरुद्ध सचिन घारू, संदीप थनवार आणा राहुल कंडारे या तिघांचा कट रचून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. याबाबत न्यायालयापुढे आलेल्या ५३ साक्षीदारांच्या साक्षीतून मृत सचिन, राहुल आणि संदीप या तीन सफाई कर्मचाऱ्यांपैकी सचिनचे त्रिमूर्ती कॉलेजमधील तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे त्याचा मृत्यू अनैसर्गिक पद्धतीने झाल्याचे सरकारी पक्षाने सिद्ध केले आहे. या तिघांची प्रेते सापडलेले घटनास्थळ दरंदले कुटुंबाच्या मालकीचे असून जवळपास इतर कुणाचीही घरे किंवा शेतजमीन नाही. आरोपी अशोक नवगिरे आणि संदीप कुरे यांनी दरंदलेंच्या सांगण्यावरून सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी तिन्ही मृत तरुणांना बोलावल्याचे साक्षीमधून सिद्ध झाले आहे. तसेच मोबाइल नोंदींवरून तुम्ही सहा जण शेवटच्या क्षणापर्यंत मृतांच्या सोबत होता हे सिद्ध झाले आहे. सचिनचे हातपाय तुमच्याच विहिरीत आढळून आले आहेत. तसेच या हत्येसाठी वारण्यात आलेला कोयता, लाठ्या, दांडा आणि गवत कापण्याचा विळा हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या आधारावर तुम्ही संगनमताने तसेच कटकारस्थान करून तीन हत्या केल्याचा दोष निश्चित करण्यात येत आहे.’

 

आरोपींवर ही होती कलमे
साेनई हत्याकांडमध्ये पाेलिसांनी दाखल केलेल्या दाेषाराेपपत्रात अाराेपीविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा (अॅट्रॉसिटी) अाणि खून, खुनाचा कट रचणे, पुरावा नष्ट करणे या कलमांन्वये न्यायालयाने दाेषी ठरवले अाहे. या कलमांन्वये गुन्ह्यात फाशीची शिक्षा हाेऊ शकते. यामुळे न्यायालयाच्या शिक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे.

 

मृत सचिनच्या गळ्यातील दोऱ्यामुळे सापडले अाराेपींपर्यंत धागेदाेरे
सचिनसोबत दरंदलेंच्या घरातील तरुणीचे प्रेमसंबंध होते आणि ते लग्न करणार होते हे आम्ही तपासलेल्या ५३ साक्षीदारांच्या जबानीतून आणि २२ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळीतून आम्ही न्यायालयापुढे सिद्ध केले. ज्या पद्धतीने सचिनच्या मृतदेहाची खांडोळी करण्यात आली होती त्यातून आरोपींचा मुख्य राग सचिनविरोधात होता. तसेच या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार नष्ट करण्यासाठी आरोपींनी संदीप आणि राहुलचीही हत्या केल्याचे आम्ही न्यायालयात सिद्ध केले.  तसेच या संबंधित तरुणी न्यायालयीन साक्षीत फितूर झाली असली तरी अन्य पुराव्यांवरून दोषारोप सिद्ध असल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अशोक फालके याच्याविरोधात मात्र परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.  
- उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील


मोबाइल नंबर नसल्याने सुटला फालके 
दरंदरेंच्या सांगण्यावरून फालकेने संदीप, सचिन व राहुलला बोलावून आणले आणि दांडक्याने यांची हत्या केली हा आरोप आमचे पक्षकार अशोक फालकेच्या विरोधात होता. परंतु त्याचा मोबाइल नंबरच पंचनाम्यात समाविष्ट नव्हता. तसेच ज्या लाकडी दांडक्याने हत्या केल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे होते तो दांडका रासायनिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यावर रक्ताचे डाग होते किंवा नाही हे सरकारी पक्ष न्यायालयात सिद्ध करू शकले नाही. तपासातील या दोन्ही त्रुटींकडे लक्ष वेधून घेत, अन्य आरोपींसोबत आमच्या पक्षकाराचे संबंध किंवा संगनमत नाही हे आम्ही न्यायालयापुढे मांडल्याने त्यांची निर्दोष मुक्तता झाली. 
– राहुल कासलीवाल, अशाेक फालकेचे वकील