आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू न झाल्यास पुन्हा संप, अध्यक्ष छाजेड यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक  - एसटी कर्मचाऱ्यांचा २४ महिन्यांपासून रखडलेला वेतन कराराचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. १ मे रोजी समाधानकारक वेतन करार करण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. मात्र, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच त्याचप्रमाणेच वेतन करार करावा अन्यथा पुन्हा बेमुदत संप पुकारण्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी गुरुवारी (दि. १२) एल्गार मेळाव्यात दिला.

 

एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इंटकच्या वतीने चोपडा लॉन्स येथे एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छाजेड बोलत होते. व्यासपीठावर इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी, के. के. नायर, एच. बी. रावराजे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड, धर्माजी भोसले, श्रीकांत सटू, डी. पी. बनसोड, शिल्पा काकडे आदी उपस्थित होते. खासगी कंपन्यांकडून शिवशाहीच्या नावाखाली केवळ कमाई करण्याचेच काम केले जात आहे. शिवशाहीच्या नावाखाली सुरू असलेल्या हा कारभार बघता शिवाजी महाराजांनी रावतेंचा कडेलोट केला असता अशीही टीका छाजेड यांनी केली. संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी प्रास्ताविक केले. पानगव्हाणे यांनी इंटकच्या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. बंडोपंत वाडकर, भगतसिंग पाटील, एच. बी. रावराजे, धर्माजी भोसले, श्रीकांत सटू, डी. पी. बनसोड, शिल्पा काकडे, प्रिया भामरे यांच्यासह इंटक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

रावतेंच्या भ्रष्टाचाराची सीडी पुराव्यासह बाहेर आणणार : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सीडी तयार केली असून, ती योग्यवेळी पुराव्यासह बाहेर काढणार आहे. रावतेंच्या कारभारात कोणत्या ठेकेदारांना कामे मिळाले हे सर्वांसमोर आणल्यानंतर मुंबई सेंट्रलचे कार्यालय हादरून जाईल, असेही छाजेड यंानी यावेळी सांगितले.

 

सह्या केल्या तर बोटे शिल्लक ठेवणार नाही : कर्मचाऱ्यांच्या हितासाठी दिवाळीच्या कालावधीत एसटी कामगार संघटना व इंटकने संप पुकारला होता. मात्र, हा संप मिटल्यावर कामगार संघटनेचे नेते हनुमंत ताटे हे रावते यांच्या दालनात शिरा खात असल्याचा गौप्यस्फोट छाजेड यांनी केला. जर परिवहनमंत्र्यांच्या १२०० कोटींच्या प्रस्तावावर कामगार प्रतिनिधींनी सह्या केल्या तर त्यांचे बोटे शिल्लक ठेवणार नाही, असे आव्हान छाजेड यांनी मेळाव्यातून दिले.

 

शासनाचा कारभार कामगारविरोधी : मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व राज्यातील फडणवीस सरकार आंधळे व बहिरे आहे. त्यांना कामगारांच्या समस्या, प्रश्न अद्यापपर्यंत समजलेले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संप पुकारण्यात आल्यास त्याला इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे यावेळी इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी जाहीर केले. मोदी केवळ आश्वासन देऊन सत्तेवर आले. मात्र, त्यांना अाता त्या आश्वासनाचा विसर पडला असल्याची टीकाही यावेळी रेड्डी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...