आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या अाठ ग्रामसेवक 'स्वच्छतादूतांचा' बिहारमध्ये डंका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- स्वच्छ भारत अभियानात पिछाडीवर असलेल्या बिहारमध्ये देशभरातून १० हजार स्वच्छतादूत दाखल झाले अाहेत. ३ ते १० एप्रिल दरम्यान त्यांच्याकडून नागरिकांचे प्रबोधन करत त्यांना स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यास प्रवृत्त केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांचाही त्यात सहभाग अाहे. सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवीचे ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ५ दिवसांपासून हे पथक बिहार राज्यातील चंपारण्य येथे प्रबोधनाच्या कामात व्यस्त आहे. प्रबोधनातून मनपरिवर्तन करण्यात त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश आले आहे. अवघ्या एका आठवड्यात बिक्रम तालुक्यात ६२०० स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्यक्षात येथे ३२०० शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट त्यांना देण्यात आले होते. 


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बिहारमध्ये जेमतेम ५० टक्के काम झाले आहे. पिछाडीवर पडलेल्या बिहारमधील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन तेथील कामाचा वेग वाढविण्यासाठी देशभरातून ६५६३ स्वच्छता दूतांना येथे पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये १५०९ महिलांचा समावेश आहे. देश स्वातंत्र्याच्या आंदोलनात मैलाचा दगड ठरलेल्या महात्मा गांधींच्या चंपारण्य सत्याग्रहास १०० वर्ष पूर्ण होत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत १० एप्रिल रोजी 'सत्याग्रह ते स्वच्छाग्रह' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अाहे. देशातील निवडक स्वच्छतादूतांचा येथे सन्मान केला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बिहारमध्ये देशभरातून स्वच्छतादूत दाखल झाले अाहेत. ३ एप्रिलपासून त्यांनी प्रबोधनास प्रारंभ करत नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आहे. 


पाटणा जिल्ह्यातील बिक्रम तालुक्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्यातील स्वच्छता दुतांवर सोपविण्यात आली आहे. सकाळी ५.३० वाजता उठल्यापासून त्यांचे कामकाज सुरू होते. स्थानिक अधिकाऱ्यांसोबत गुड माॅर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसणाऱ्या नागरिकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करतानाच शौचालयाचे महत्व पटवून दिले जाते. त्यानंतर शाळा आणि गृहभेटी देऊन स्वच्छतेसंदर्भात प्रबोधन करण्यात येते. रात्री ६ ते ९ वाजेच्या दरम्यान गावोगावी चौकसभा घेतल्या जातात. गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत हे काम सुरू आहे. 


स्वच्छतागृहासाठी प्रत्येक कुटुंबास अनुदान
महाराष्ट्रात २०१२ मध्ये झालेल्या बेसलाईन सर्व्हेक्षणाच्या यादीत नावे असलेल्या कुटुंबांना स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यासाठी १२ हजारांचे अनुदान दिले जाते. या यादीत नाव नसलेल्या कुटुंबांना स्वखर्चातून शौचालयांचे बांधकाम करून त्याचा वापर करावा लागतो. बिहारमध्ये बेसलाईन सर्वेक्षणाच्या यादीत नावे नसलेल्या कुटुंबांना राज्याच्या 'लोहिया स्वच्छ बिहार मिशन' मधूनही १२ हजारांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना थेट आर्थिक झळ सोसावी लागत नाही. असे असतानाही येथे केवळ ५० टक्के काम झाले अाहे. त्यामुळेच येथे स्वच्छतादुतांमार्फत शौचालयांचे बांधकाम करून त्याचा वापर करण्यासाठी प्रबोधनाचे काम हाती घेण्यात आले आहे. 


हे आठ जण बनले 'स्वच्छतादूत'
सिन्नरचे ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकात परेश जाधव, देवळ्याचे गटसमन्वयक महेश भामरे, चांदवडचे ग्रामसेवक जयदीप ठाकरे, विशाल सोनवणे, भागवत सोनवणे, येवल्याचे बाळनाथ बोराडे, सुरगाण्याचे एस. पी. देशमुख या आठ ग्रामसेवकांची 'सत्याग्रह ते स्वच्छाग्रह' या उपक्रमासाठी निवड झाली आहे. हागणदारी मुक्तीसंदर्भात उल्लेखनीय कामगिरी केल्याने नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 


कृतीतून स्वच्छतादुतांचे यश 
बिक्रम तालुक्यात एका आठवड्यात ३२०० स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. लोकप्रबोधनाचे काम प्रभावीपणे करण्यात आल्याने नागरिकांचे मनपरिवर्तन झाले. आठवड्यात ६२०० शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून उद्दिष्टाहून दुप्पट झालेले काम हे चांगल्या कामाचे द्योतक आहे.

-संजय गिरी, पथक प्रमुख 

बातम्या आणखी आहेत...