आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपडताळणीसाठी हजाराे प्रकरणे; कर्मचारी मात्र दाेन, पालकांचा संताप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नव्या शैक्षणिक प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यासोबत जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जातपडताळणी कार्यालयात पालकांची गर्दी उसळली असताना मागील चार-पाच महिन्यांपासून जातपडताळणी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेली हजारो प्रकरणे रखडल्याने संतापलेल्या पालकांनी गुरुवारी (दि. १४) जातपडताळणी कार्यालयात हंगामा केला. कार्यालयात केवळ दोनच कर्मचारी कार्यरत असल्याने प्रकरणे दाखल करण्यासही मोठ्या प्रमाणावर वेळ लागत असल्याचे चित्र दिसून आले. 


बारावी, दहावीच्या निकालानंतर नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी जातीच्या दाखल्यासोबत जातपडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याचा भार असलेल्या पुणेरोडवरील समाजकल्याण विभागातील जातपडताळणी विभागाकडे 'पेंडिंग फाइल'चे प्रमाणही वाढले आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून या कमिटीकडे सादर करण्यात आलेली हजारो प्रकरणे रखडली असल्याचे चित्र आहे. जातपडताळणी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेली अनेक प्रकरणे केवळ कागदोपत्री दाखल करून त्यांची कोणतीही रीतसर नोंद न ठेवली गेल्याने यातील काही प्रकरणे गहाळ झाल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. 


या प्रकरणात अनेकांनी कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडल्या असल्याने नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश कसा मिळवायचा, असा प्रश्न पडलेल्या पालकांनी गुरुवारी (दि. १४) जातपडताळणी कार्यालयात धाव घेतली. यामध्ये अनेक पालकांनी २०१७ मध्ये जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रकरण दाखल केले होते. मात्र, वर्षानंतरही कोणतीच कार्यवाही न झाल्याने संतापलेल्या पालकांनी थेट जातपडताळणी कार्यालयात गर्दी केली. ज्या ठिकाणी प्रकरण दाखल केले जाते, त्या ठिकाणी केवळ दोनच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केले. 


प्रशासनाने लक्ष देण्याची गरज... 
प्रवेशप्रक्रियेत जातपडताळणी प्रमाणपत्राची सक्ती केली जात अाहे. समाजकल्याण विभागात पडताळणीसाठी प्रकरण दिल्यानंतर प्रमाणपत्र मिळत नाही. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 
- खंडू गिते, पालक 


चकरा माराव्या लागताहेत... 
दोन महिने होऊनही पडताळणीचे काम होत नाही. कार्यालयात आल्यानंतर 'तुमचे काम झाले नाही', असे उत्तर दिले जाते. दररोज चकरा माराव्या लागत आहेत. 
- एकनाथ राणे, पालक 


कर्मचाऱ्यांची कमतरता... 
कार्यालयात केवळ दोनच कर्मचारी बसलेले असतात. शेकडो पालक दररोज जातपडताळणीसाठी कार्यालयात येत आहेत. पालकांचे अर्ज स्वीकारण्यासाठीही अतिरिक्त कर्मचारी त्या ठिकाणी नाही. 
- एकनाथ चौरे, पालक 


सिन्नरहून दररोज यावे लागतेय... 
 काॅलेजकडून जातपडताळणी प्रमाणपत्राची सक्ती केली जात आहे. तर जातपडताळणी कार्यालयात प्रमाणपत्र लवकर दिले जात नाही. त्यामुळे दररोज सिन्नर येथून चकरा मारावे लागत आहेत. 
-वसंत देशमुख, पालक 

बातम्या आणखी आहेत...