आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्‍लास्टिकबंदीमुळे व्यापाऱ्यांची दिवसभर कसरत, काही माॅलमध्ये सर्रास वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर शहरात शनिवारी (दि. २३) दिवसभर दूध, किराणा, मिठाई, कापड अशा अनेकविध दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किरकाेळ अाणि घाऊक विक्रेत्यांना चांगलीच कसरत करावी लागली. दंडाची माेठी रक्कम परवडणारी नसल्याने रविवार कारंजा भागातील काही नामांकित किराणा व्यावसायिकांनी सकाळपासूनच प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये असलेल्या वस्तू रॅकमधून हटवत दुकाने रिकामी केली, तर दुसरीकडे काही माॅल्समधून मात्र सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांच्या हाती पडत हाेत्या. त्यामुळे नियम फक्त किरकाेळ व्यावसायिकांनाच का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात हाेता.


राज्यात प्लास्टिकबंदीची अधिसूचना लागू झाल्यापासूनच विक्रेत्यांमध्ये याबाबत प्रचंड संभ्रम पाहायला मिळत हाेता. सरकारने पर्याय न देता अचानक बंदी लादल्याने संतापही पहायला मिळत हाेता. हीच स्थिती शनिवारीही शहरात पाहायला मिळाली. मध्यरात्रीपासून ही अधिसूचना 'जैसे थे'च लागू झाल्याने व्यावसायिकांत अस्वस्थता हाेती. सकाळी दुकाने उघडण्यापूर्वीच प्लास्टिकबंदीच्या कारवाईचा सामना कसा करायचा याबाबत व्यावसायिकांनी काळजी घेतल्याचे पहायला मिळाले. रविवार कारंजा परिसरातील हेमंत पवार यांनी त्यांचे दुकान सकाळीच माेकळे केलेे, मात्र पुड्यांत माल बांधून देण्यासाठी दिवसभर माेठी कसरत करावी लागल्याची त्यांची भावना हाेती. दहा-वीस वर्षे पुढे जाण्याचा विचार करण्याएेवजी तेवढाच काळ मागे गेल्याचे जाणवल्याचा अनुभव या शासनाने दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

अभ्यास न करता निर्णय; फटका ग्राहकांना
सरकारने कुठलाही अभ्यास अाणि वास्तवाचा विचार न करता, पर्याय न देता राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू केला. मात्र याचा फटका व्यापारी, ग्राहक या दाेहाेंनाही बसत अाहे. खाकी पुड्यांमध्ये रवा, साखर यांसारख्या वस्तू पॅक केल्यानंतर त्या गळत असल्याने ग्राहक नाराज हाेत हाेते.
- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक घाऊक धान्य किराणा व्यापारी असाेसिएशन

 

दहीवडा वाटीत, पाणीपुरी द्राेणमध्ये
प्लास्टिकबंदी लागू झाल्यापासून दहीवडा स्टीलच्या वाटीत देताेय तर पाणीपुरी कागदी द्राेणमधून देताे अाहे. मात्र, शनिवारी चटणी कशी द्यायची अशी अडचण अाल्याने एकही पार्सल देऊ शकलाे नाही. याचा परिणाम थेट व्यवसायावर झाला.
- माेहनभाई चाैधरी, संचालक, सागर सम्राट स्वीटस‌्

 

संपूर्ण दुकान सकाळीच केले रिकामे
पावशेर, एक किलाेचे पुडे बांधणे ठीक अाहे; पण पाच-पाच किलाे साखर, रवा यांचे पुडे कसे बांधायचे? नेमकी बंदी कशावर अाहे? याबाबतचा संभ्रम अाणि दंडाची रक्कम न परवडणारी असल्याने सकाळीच संपूर्ण दुकानातील पॅकिंगचा माल काढून घेतला. दिवसभर माेठी कसरत करावी लागली.
- हेमंत पवार, घाऊक किराणा व्यापारी

 

बातम्या आणखी आहेत...