आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण आहार खाल्ल्याने दाेन बालकांसह महिला अस्वस्थ; इगतपुरीजवळील अंगणवाडीत प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी- इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव क्रमांक १ च्या अंगणवाडीत विद्यार्थ्यांना दिलेली पोषण आहाराची खिचडी खाल्ल्याने दाेन बालकांसह एका महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खिचडीत विषारी गोम असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून, अधिकाऱ्यांनी याबाबत बारकाईने तपासणी करण्याचे सांगितले आहे. संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. 


अंगणवाडीसेविका मंगला हरिनामे गैरहजर असल्याने मदतनीस जया शिंदे यांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास तळेगाव येथील अंगणवाडीतील बालकांना घरोघरी जाऊन आहार दिला. सहा महिन्यांच्या शुभांगी सुरेश कुंदे या बालिकेच्या घरी खिचडी दिल्यानंतर त्या निघून गेल्या. या बालिकेची आई शीतल सुरेश कुंदे (२५) यांनी हा आहार खाल्ल्याने त्यांना उलट्या होऊ लागल्या. कुंदे कुटुंबीय व श्रमजीवी संघटनेचे तानाजी कुंदे यांनी आहाराची तपासणी केली असता त्यात गोम आढळल्याचा दावा केला. कुंदे यांनी तत्काळ बालविकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे यांना याबाबत माहिती दिली. अंगणवाडीतील इतर बालकांना विषबाधा झाली की नाही याबाबत खात्री करण्यात आली. 


दरम्यान, शीतल कुंदे या महिलेसह खबरदारी म्हणून तिची सहा महिन्यांची मुलगी शुभांगी, तसेच अंगणवाडीचे विद्यार्थी युवराज पांडुरंग धनगर (३), नंदिनी विजय वर्मा (३) या चारही जणांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, त्यांना २४ तास निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, संतोष ठोंबरे आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात भेट घेत या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

 

चौकशीनंतर दोषींवर कारवाई 
या प्रकरणाची चौकशी करून, दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. 
- सोपान ढाकणे, बालविकास प्रकल्प अधिकारी 

बातम्या आणखी आहेत...