आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून नाशिकमधील मतदान केंद्रावर समर्थकांमध्ये राडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- पैठणी वाटपाचा पश्चाताप झाला. त्यामुळे मी माघार घेऊन प्रा. संदीप बेडसे यांना पाठिंबा देत आहे, अशी खोटी पोस्ट किशोर दराडे यांच्या नावाने सोशल मीडियावर विरोधकांनी पसरवली. त्यामुळे दराडे समर्थकांमध्ये तीव्र संताप उमटल्याने त्यांनी ही तक्रार आमदार नरेंद्र दराडे यांच्या कानावर घातला. तेव्हा खोटा आरोप होत असल्याचे पाहून संतापलेले आमदार दराडे यांनी शिव्यांची लाखोली वाहिली. दराडे यांच्या समर्थकांनी बेडसे यांच्या एका समर्थकाला शिवीगाळ केली. त्यामुळे दोन्ही समर्थकांमध्ये वाद विकोपाला गेला. त्यावेळी बेडसे समर्थकाने दराडे समर्थकाच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची घातली. यावेळी आमदार दराडे यांनी पुढाकार घेत वाद न वाढविता मिटवून घेतला. 


शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळपासून नाशिक येथील मतदान केंद्रावर मतदारांची आणि उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी होती. यावेळी संदीप बेडसे यांच्या कार्यकर्त्याने किशोर दराडे यांनी माघार घेऊन बेडसे यांना पाठिंबा दिल्याचा खोटा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला. याबाबतची माहिती विधानपरिषदेवर नव्यानेच निवडून अालेले आमदार नरेंद्र दराडे यांच्या कानावर घातली. 


अामदार नरेंद्र दराडे यांनी शिवीगाळ करीत अापल्या समर्थकांसह प्रा. बेडसे यांच्या समर्थकांवर धावून गेले. बेडसेंच्या समर्थकाने दराडे यांच्या समर्थकाच्या डाेक्यावर प्लास्टिकची खुर्ची मारली. याप्रसंगी माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. पोलिसांनी धाव घेत प्रकरण शांत केले. याबाबत दोन्ही गटांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकारांना सांगितले की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक पोस्टची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. 


शिक्षक अामदार निवडणुकीच्या मतदानाप्रसंगी किशाेर दराडे समर्थक व दुसरे उमेदवार प्रा. संदीप बेडसे समर्थकांमध्ये मतदार केंद्राबाहेरच भरपावसात हाणामारी झाली. पाेलिसांनी वेळीच दाेन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने प्रकरण शांत झाले. यावेळी मतदारांमध्ये थाेडी पळापळ झाली. 


जिल्ह्यात मतदानप्रक्रिया शांततेत 
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. सकाळपासूनच अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून येत हाेत्या. काही ठिकाणी सकाळी अल्प प्रतिसाद तर दुपारनंतर गर्दी वाढलेली दिसून अाली. 


मालेगाव तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रांपासून शंभर मीटर अंतरावर उमेदवारांचे बूथ उभारण्यात अाले हाेते. या बूथवर उमेदवारांचा फाेटाेविरहित २ बाय ३ सेंमी अाकाराचा फलक लावण्यास परवानगी हाेती. सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी देवरे यांनी फाेटाेचे फलक काढून घेण्याच्या सूचना बूथ प्रतिनिधींना केल्या हाेत्या. प्रतिनिधींनी माेठ्या अाकारातील बॅनरवरील फाेटाे मागील बाजू करत त्याची घडी घालून पुन्हा बॅनर लावल्याचे देवरे यांना अाढळून अाले. त्यांनी पाेलिस फाैजफाट्यासह येऊन उमेदवार प्रतापदादा साेनवणे यांच्या बूथवरील बॅनर व अन्य साहित्य जप्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पाेलिसांनी बॅनरसह दाेघांना ताब्यात घेतले. यावरून साेनवणे यांचे प्रतिनिधी व देवरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. परवानगी घेऊनच बॅनर लावला अाहे. ही तुमची दडपशाही असल्याचा अाराेप करण्यात अाला. यानंतर देवरे यांनी भाजपचे उमेदवार अनिकेत पाटील यांच्या फाेटाेचे बॅनर हटविण्यास भाग पाडले. 


तालुकानिहाय मतदान 
नाशिक विभाग शिक्षक अामदार निवडणुकीसाठी चांदवडला सर्वात जास्त मतदान झाले. मालेगावमध्ये ९० टक्के, सटाणा ९४ टक्के, पेठ ९७ टक्केे, दिंडाेरी ९४.२८ टक्के, नांदगाव ९७.३९ टक्के, इगतपुरी ९५.३३ टक्के, कळवण ९६.१५ टक्के, चांदवड ९७.६७ टक्के, येवला ९६.४३ टक्के, सिन्नर ९७ टक्के, निफाड ९५.४० टक्के मतदानाची नाेंद करण्यात अाली. 

 

निवडणुकीत विजयी हाेणार असल्याचा अनेक उमेदवारांना विश्वास 
शिक्षक अामदार मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नाशिक विभागात ९२ टक्के इतके मतदान झाल्याने सर्वच उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. प्रत्येक उमेदवाराने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आम्हालाच मतदान केले असून विजयी हाेण्याची खात्री व्यक्त केली अाहे. 


शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा याेग्य पाठिंबा, अामच्या व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहाेरात्र घेतलेल्या मेहनतीमुळे शिक्षकांचा मिळालेला कौल यावरून माझाच विजय होईल, असा दावा नाशिकमधील उमेदवार किशाेर दराडे यांनी व्यक्त केला. याचबराेबर महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शिक्षक संघटनांनी मला पाठिंबा दिल्याने विजयाची खात्री अाहे. याचबराेबर नाशिक, धुळे जळगावमधून मला चांगली अाघाडी मिळेल, असा विश्वास उमेदवार प्रा. संदीप बेडसे यांनी व्यक्त केला. नाशिक विभागात जादा म्हणजेच ९२ टक्के इतके मतदान झाल्याने त्याचा नक्कीच मला फायदा होणार असल्याचे भाजपने पुरस्कृत केलेले अनिकेत पाटील यांनी सांगितले. याचबराेबर धनशक्तीला विरोध करून आणि शिक्षकांना या वेळेस शिक्षकच आमदार हवा आहे. त्यामुळे मला विभागातील पाचही जिल्ह्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विजय माझाच होईल, अशी अाशा शिक्षक असलेले भाऊसाहेब कचरे यांनी व्यक्त केली. याचबराेबर शेवटपर्यंत माघारीसाठी अनेकांनी प्रयत्न करूनही रिंगणात असलेल्या माजी खासदार व माजी अामदार राहिलेल्या प्रतापदादा सोनवणे यांनी प्रामाणिक शिक्षकांनी मलाच मतदान केलेले अाहे. त्यामुळे माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...