आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजकार्यासाठी स्वतःहून पुढे येणाराच 'हीरो'; ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जीवनात प्रत्येक व्यक्तिमत्त्वात हीरो दडला असतो. त्या दडलेल्या खऱ्या हीरोला चांगल्या समाजकार्यासाठी बाहेर काढून सत्कर्म साधा. जो समाजकार्यासाठी स्वतःहून पुढे येतो तोच खरा हीरो असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केले. 


येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संस्थेच्या निफाड तालुक्यातील सोनेगाव येथील स्व. कचेश्वर फकिरा पाटील माध्यमिक विद्यालय व कामठवाडे येथील स्व. प्रभाकर पुरुषोत्तम वैशंपायन या दोन्ही शाळांच्या नामकरण समारंभाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून पिळगावकर बोलत होते. व्यासपीठावर रामानंद सागरनिर्मित 'श्रीकृष्ण' मालिकेत श्रीकृष्णाची अजरामर भूमिका साकारणारे अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, 'रणांगण' या चित्रपटातील नवअभिनेत्री प्रणाली गोगरे, स्व. कचेश्वर फकिरा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या रजनी पाटील, संस्था अध्यक्ष प्रकाश वैशंपायन, संस्थेचे उपाध्यक्ष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 


अभिनेते सचिन पुढे म्हणाले की, आम्ही चित्रपटातले हीरो असलो तरी ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी तन, मन, धनाने वाहून घेतले तेच खरे पडद्यामागील हीरो आहेत. समाजकार्यासाठी पुढे या, त्यासाठी वयाचे बंधन नसावे तसेच त्या व्यक्तिमत्त्वात कोणावरही उपकार करत आहोत अशी भावना नसावी, असेही त्यांनी सांगितले. 


याप्रसंगी वैशंपायन म्हणाले की, संस्था चालविणे कठीण होत आहे. या संस्थेतून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकडून फी आकारली जात नसल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर फडोळ कुटुंबीयांनी एक रुपया घेऊन आपल्या मालकीची दीड एकर शेती विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब वैशंपायन व स्व. कचेश्वर फकिरा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या निफाड येथील फडोळ कुटुंबीयासह संस्था पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित हाेते. सूत्रसंचालन अनुराधा बस्ते यांनी केले. 

बातम्या आणखी आहेत...