आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याेगदिन विशेष : अंधारलेल्या आयुष्याची योगसिद्ध प्रकाशमय वाटचाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अंधारी खोली... अधून-मधून अाठ-अाठ दिवस स्वत:ला तिच्यात काेंडून घेत अन्न अन् पाणीही त्यागलेले.. कुणाशी बोलणे नाही, प्रकाशाची तिरीपही नाही.. काळोखाशीच मैत्री आणि काळोखच वैरी.. काही महिन्यांपूर्वी अशा भीषण परिस्थितीमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय 'ईश्वरी'ने स्वत:ला अाता सामाजिक आव्हानांसाठी तयार केले आहे. हे घडले अाहे केवळ योगसाधनेच्या माध्यमातून. हा चमत्कारच असल्याचे ती आणि तिच्या आईने 'दिव्य मराठी'ला सांगितले. 


जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नैराश्य आणि आत्मघाती प्रवृत्तीसारख्या समस्यांवर मात करणाऱ्या धाडसी मुलीची ही गोष्ट.. नैराश्याच्या अतिशय गंभीर समस्येने ग्रासलेल्या ईश्वरीने दोन महिने नाशिकच्या योग विद्याधाममध्ये योग प्रवेश हा अभ्यासक्रम पूर्ण केला अाणि ताेपर्यंत कुणाशी बोलायलाही बिचकणारी ईश्वरी आता शिक्षणासाठी, स्वत:चे करिअर घडविण्यासाठी माेठ्या हिमतीने बाहेरगावी जाऊन राहते. 


सध्याच्या समाजव्यवस्थेमध्ये असलेले स्पर्धेचे वातावरण पाहता, लहान मुलांपासून मध्यमवयीन, ज्येष्ठांमध्येदेखील नैराश्य मोठ्या प्रमाणावर दिसते अाहे. आजाराला, पारिवारिक अडचणींना कंटाळून किंवा आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येचा पर्याय स्वीकारणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सामान्य व्यक्तीच नाही तर नावाजलेल्या आणि सर्वार्थाने सक्षम व्यक्तीही आत्महत्येसारखा गंभीर पर्याय निवडत अाहेत. मात्र, नैराश्य सामान्य किंवा असामान्य व्यक्ती असे वर्गीकरण करून येत नाही. कोणत्याही व्यक्तीला नैराश्याने ग्रासले जाऊ शकते. 


अशा परिस्थितीमध्ये योग साधनेच्या माध्यमातून अतिशय गंभीर स्तरावर पोहोचलेल्या नैराश्यावर मात करता येऊ शकते, हे ईश्वरीने सिद्ध करून दाखविले. फक्त दोन महिन्यांच्या प्रयत्नांनी तिला या नैराश्यातून बाहेर काढले. कधीही कुणाशी न बोलणारी मुलगी, योग वर्गातील मित्रमैत्रिणी तसेच शिक्षकांमध्ये मिसळू लागली. (मुलीचे नाव बदललेले आहे.) 


तणावाच्या काळात प्रेरणादायी उदाहरण 
या प्रकारच्या नैराश्यामध्ये जाणाऱ्या व्यक्ती खूप प्रयत्नांनी नैराश्यातून बाहेर येतात. यामध्ये निद्रानाश, भूक न लागणे, माणसांची भीती वाटणे यासारखे गंभीर प्रकार होऊ शकतात. त्यांच्यावर योग साधना आणि प्राणायाम करून विजय मिळवता येतो. योग साधनेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या त्रासानुसार विविध उपाय दिले गेले आहेत. त्यांचा वापर करून स्वत:च्या त्रासावर नियंत्रण मिळविलेल्या व्यक्तीचे हे उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. 


ईश्वरी मित्रांच्या गोतावळ्यात.. 
अनेक महिने सातत्याने स्वत:ला चार ते अाठ दिवस अंधाऱ्या खोलीत बंद करून घेणारी, तहान-भुकेची जाणीवही न हाेणारी, मनाला वाटेल तेव्हा योग वर्गातूनही उठून जाणारी, समोरच्याच्या बोलण्यावर अजिबात लक्ष केंद्रित करू न शकणारी ईश्वरी आज मित्र-अाप्तांच्या गाेतावळ्यात समाधानी अाहे. परिवारातील व्यक्तींचा, स्वत:च्या करिअरचा विचार करून सामाजिक परिस्थिती स्वीकारत आहे. 

बातम्या आणखी आहेत...