आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; लाजिरवाणी लोकसंस्कृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार कोणतीही सेवा पुरवत असते ती लोकांच्या सुविधेसाठीच. पण, सरकारी अथवा सार्वजनिक सेवेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सर्वांची सोय याऐवजी मनमानी पद्धतीने तिचा उपयोग करून घेण्याचा प्रत्येकाला मिळालेला जणू परवाना असा बनला आहे. त्याची परिणती या सेवा कार्यक्षमतेने चालण्याऐवजी त्यांना खीळ बसण्यातच होत असल्याची उदाहरणे जागोजागी दिसतात. रेल्वे प्रशासनाला अलीकडेच घ्यावा लागलेला मनोरंजनाच्या साधनांबाबतचा निर्णयदेखील उपद्रवी प्रवाशांच्या अशाच मानसिकतेचा परिपाक आहे.  


प्रचंड क्षेत्रफळ असलेल्या आपल्या देशात वाहतूक आणि दळणवळणाच्या कार्यक्षम सुविधा लोकांचे जीवन सुकर करण्यात मोठाच हातभार लावतात. त्यातही रस्ते अथवा विमान प्रवासापेक्षा रेल्वे सेवा अधिक स्वस्त आणि मस्त असल्याने आपापली गंतव्य स्थाने गाठण्यासाठी जास्तीत जास्त प्रवाशांची प्रथम पसंती रेल्वेला असते. साहजिकच बाराही महिने रेल्वे आरक्षणासाठी तोबा गर्दी पाहावयास मिळते. आपल्या प्रवाशांना जास्तीत जास्त सोई मिळाव्यात म्हणून रेल्वेची यंत्रणाही प्रयत्नशील असते. त्यातूनच आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे वेगवेगळ्या सोई प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचे प्रयोग राबवले जातात. मोबाइलची बॅटरी रिचार्ज करता यावी म्हणून डब्यात चार्जिंगची सोय, अधिक आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने आसनांची रचना अशा गरजांची पूर्ती करतानाच काही खास प्रकारच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी आसनांच्या पाठीमागे छोटे एलसीडी स्क्रीन बसवणे, हेडफोन्स उपलब्ध करून देणे वगैरे उपाय प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले गेले. प्रवासातील वेळ मजेत जावा हाच त्यामागचा उद्देश होता. हा प्रयोग यशस्वी झाला तर लवकरच अन्य रेल्वेगाड्यांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा विचार प्रस्तुत धोरणाची आखणी करतेवेळी होता. मात्र, प्रवाशांच्या उपद्रवीपणाला कंटाळून यापुढे नव्याने निर्मिती होत असलेल्या डब्यांमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या सुविधा न पुरवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनास घ्यावा लागला आहे. मध्ये रेल्वेने गेल्या सणासुदीच्या प्रारंभी मुंबई ते कणकवलीदरम्यान धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये मनोरंजनाच्या अशा सुविधा देऊ केल्या होत्या. परंतु, पहिल्याच फेरीपासून गाडीतील हेडफोन्स गायब होणे, आसनाच्या मागे बसवलेले स्क्रीन काढून नेण्याची खटपट करणे व ते न जमल्याने स्क्रीन फोडून टाकणे अशा प्रकारांचा सिलसिला सुरू झाला. अलीकडे बहुतेक रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा रक्षक असले तरी ते प्रत्येक प्रवाशावर पूर्णपणे लक्ष ठेवू शकत नाहीत. याचा गैरफायदा घेऊन तेजससह अशा प्रकारच्या सोई असणाऱ्या रेल्वेगाड्यांमधले साहित्य पळवापळवीचे प्रकार अव्याहत सुरूच होते. हे पाहता अखेर रेल्वे प्रशासनाला अशा गाड्यांमध्ये मनोरंजनाची साधने न बसवण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागला आहे. त्यानुसार सध्या ज्या गाड्यांमध्ये या सुविधा आहेत, त्या तशाच कायम राहतील. पण, नव्याने उत्पादित होत असलेल्या डब्यांमध्ये यापुढे ही साधने बसवली जाणार नाहीत. प्रस्तुत निर्णयाची सत्वर अंमलबजावणी करावी, असे आदेश सर्व कोच फॅक्ट्रींना देण्यात आले आहेत. तेजस, शताब्दी व तत्सम दर्जाच्या अन्य काही गाड्यांमधील प्रवाशांना आनंददायक प्रवासाची अनुभूती यावी आणि त्यांचा वेळ मजेत जावा यासाठी हा प्रयोग हाती घेण्यात आला होता. परंतु, देशाच्या विविध भागांतून रेल्वे मंत्रालयाला प्राप्त झालेल्या अशा तक्रारींची संख्या वाढतच चालल्याचे पाहून अल्पावधीतच तो गुंडाळावा लागला आहे. सामान्य दर्जाच्या गाड्यांपेक्षा या रेल्वेगाड्यांचा दर्जा अधिक असल्याने संबंधित प्रवासीसुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील हे गृहीत धरून खास दर्जाच्या गाड्यांमध्येच हा प्रयोग केला गेला. पण, आर्थिक स्तर वा शैक्षणिक पात्रता कोणतीही असली तरी त्यामुळे मानसिकतेत फारसा फरक पडत नाही, हेच एकुणातून स्पष्ट होते. 


रेल्वे असो, एस.टी. बस असो अथवा अन्य कोणतीही सार्वजनिक सेवा असो, त्याबाबत अशीच लाजिरवाणी संस्कृती वृद्धिंगत होत चालल्याचे हे लक्षण आहे. वास्तविक पाहता सर्वसामान्य माणूस एक प्रकारे या सेवांचा ग्राहकच असतो. त्यामुळे अशा सेवा जेवढ्या कार्यक्षम होतील तेवढा लाभ सर्वसामान्यांचाच होणार हे उघड आहे. परंतु, अशा उपद्रवी लोकांना अटकाव करण्याची काळजी अन्य सहप्रवासीही घेत नसल्यामुळे अखेर ही वेळ आली आहे. सार्वजनिक सेवांबाबतची ही लाजिरवाणी लोकसंस्कृती कायम राहिल्यास येत्या काळात अधिकच्या सुविधा मिळणे तर दूरच, उलट आहेत त्या सेवाही आक्रसण्याचीच शक्यता अधिक. 


- अभिजित कुलकर्णी, डेप्युटी एडिटर, नाशिक

बातम्या आणखी आहेत...