आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमधील एका कंपनीसह दाेन बियाणे विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे, कृषि विभागावरही संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - राज्यात कपाशीवरील बोंडअळीचे प्रकरण अद्यापही ताजे असतानाच आता गुजरातमधील एका कंपनीला महाराष्ट्रात बियाणे विक्री आणि साठवणुकीची परवानगी नसतानाही कंपनीने सर्रास कमी गुणवत्तेची कोथिंबीर बियाण्यांची विक्री केली आहे.

 

त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोथिंबीर उत्पादनामध्ये नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुजरातमधील एका कंपनीसह दाेन विक्रत्यांविराेधात गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत. कृषी विभागाने बियाणे, कीटकनाशके आणि खते यांच्या गुणवत्तेसाठी आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात तालुक्याला, तालुका पंचायतीमध्ये, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आणि कृषी सहसंचालक कार्यालयाला स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नेमलेले आहे. तरीही परराज्यातून हे बियाणे आलेच कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

नाशिक जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अण्णासाहेब नामदेव साठे यांनी १५ नोव्हेंबर २०१७ रोजी नाशिकरोड येथील प्रगत सेवा केंद्रामध्ये बियाणे तपासणीसाठी भेट दिली. यावेळी सदर दुकानामध्ये गुजरातमधील जुनागढ येथील मे. तुलसी अॅग्राे सीड‌्स कंपनीने निर्माण केलेले कोथिंबिर बियाण्याचा नमुना तपासणीसाठी घेतला. हा नमुना पुणे येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेमध्ये २५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठविण्यात आला. तर पुणे येथील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेने २६ डिसेंबर २०१७ रोजी पाठविलेला तपासणी अहवाल नाशिक कृषी जिल्हा अधीक्षक कार्यालयाला ९ जानेवारी रोजी प्राप्त झाला. या तपासणी अहवालामध्ये प्रयोगशाळा व्यवस्थापनाने स्पष्टपणे म्हटले आहे की, या कोथिंबिर बियाण्याची उगवण क्षमता ६५ टक्क्यांऐवजी ३० टक्के आहे. त्यामुळे या बियाण्याचा नमुना अघोषित करण्यात येत आहे.

 

त्यामुळे तुलसी अॅग्राे सीड‌्स यांनी कमी गुणवत्तेचे बियाणे उत्पादन व विक्री केल्यामुळे राज्याची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल केला आहे. तर प्रगत कृषी सेवा केंद्राने व मे. श्रीराम अॅग्रो एजन्सीने शेतकऱ्यांना विक्री करून त्यांची फसवणूक केल्याने कृषी विभागाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे बोंडअळीबाधित कापूस उत्पादकांना मदत मिळाली नसतानाच आता कोथिंबिरीमध्येही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पुढे आले आहे.
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे या बनावट बियाण्यांमुळे नुकसान झाले अाहे. त्यांनी संबंधित विक्रेत्यांनी दिलेल्या पावत्यांसह तक्रार करण्यासाठी पुढे यावे. अशा विक्रेत्यांवर अाणि कंपन्यांवर कारवाई करणेदेखील साेपे हाेईल अाणि भविष्यात शेतकऱ्यांचे हाेणारे नुकसानदेखील टळेल, असे अावाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत अाहे.

 

विक्री बंद करण्याचे दिले अादेश
मे. प्रगत कृषी सेवा केंद्राने या बियाणे विक्रीबाबत २९ जानेवारी २०१८ रोजी दिलेला खुलासा हा अपूर्ण व असमाधानकारक आहे. त्यांच्याकडील शिल्लक अप्रमाणित कोथिंबीर बियाणे साठा (५०० ग्रॅमची १२ पाकिटे) यांना विक्रीबंद आदेश देण्यात आले आहे.तसेच जप्ती आदेशही देण्यात आले आहे. तर मे. श्रीराम अॅग्रो एजन्सीजला बियाणे विक्री केंद्राची तपासणी करण्यासाठी अधिकारी समक्ष उपस्थित असूनही एजन्सी-चालकाने कोणतेही सहकार्य केले नाही.तसेच कोणतेही अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे त्यांना कारवाई करण्याचे लेखी आदेश देण्यात आले, असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

संपूर्ण तपासणीनंतरच गुन्हा दाखल
संबंधित कंपनीला महाराष्ट्रात बियाणे विक्री व साठवणुकीची परवानगी नसतानाही त्यांनी शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. संपूर्ण तपासणी केल्यानंतरच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अण्णासाहेब साठे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...