आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदासाठी भुजबळांच्या दौऱ्यात मोर्चेबांधणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यातील २४ जिल्हाध्यक्षांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नियुक्त्या जाहीर केल्यानंतर आता नाशिक जिल्हाध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून योगायोगाने हेवीवेट नेते छगन भुजबळ हे नाशिक दौऱ्यावर असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये धडपड सुरू झाली आहे. 


लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणामध्ये संघटनात्मक फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून एकाच पदावर असताना कार्यकर्त्यांना न्याय न देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची गच्छंती त्यातूनच सुरू झाली आहे. पुणे येथील कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तर थेट महत्त्वाच्या पदांची तरुणांना संधी द्यावी अशी भूमिका घेतली. त्यामुळे नाशिक जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अनेक तरुण कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. खासकरून लोकप्रतिनिधी राहिलेला कार्यकर्ता संघटनेचे पदाधिकारी असावा अशी अपेक्षा त्यातून व्यक्त होत आहे. जेणेकरून संघटना व लोकप्रतिनिधी यांच्यामधील दुवा म्हणून काम करणे शक्य होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांच्या जागी आक्रमक असलेल्या जयंत पाटील यांना संधी देण्यात आली. पाटील यांनी नुकतीच राज्यातील २४ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली. 


नाशिक जिल्हाध्यक्षपदाची निवड मात्र बाकी असून याचे कारण म्हणजे जामिनावर नुकतेच सुटलेले भुजबळ यांची संमती अद्याप मिळालेली नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पुणे येथील जाहीर सभेतून दिसून आले. त्यामुळे त्यांच्याशी मिळताजुळता असा जिल्हाध्यक्ष शोधण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांना संधी द्यायची की माजी जिल्हाध्यश श्रीराम शेटे यांची पुनर्नियुक्ती करायची असा मोठा पेच आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची शेटे यांना पसंती आहे. खुद्द शेटेदेखील अनुकूल आहेत. या पार्श्वभूमीवर या दोघांपैकी कोणाची निवड होते की अन्य तरुणांना संधी दिली जाते हे बघणे महत्त्वाचे आहे. भुजबळ यांच्या दौऱ्याची सांगता झाल्यानंतर जिल्हाध्यक्षपदाबाबत निर्णय होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 


तरुणांनी थोपटले दंड 
जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत तरुणांची गर्दी दिसून येत असून भुजबळ यांच्या स्वागतापासून तर अन्य उपक्रमांमध्ये ठळक उपस्थिती दिसेल अशा पद्धतीने जोरदार नियोजन केले जात आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, युवकचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, मविप्रचे संचालक सचिन पिंगळे यांच्यात चुरस आहे, मात्र ऐनवेळी स्वतः इच्छुक नसले तरी विधानपरिषदेचे माजी आमदार तसेच नाशिकचे शहराध्यक्ष राहिलेले जयवंत जाधव यांची ही जिल्हाध्यक्षपदासाठी नियुक्ती होऊ शकते. जाधव यांचा आक्रमक स्वभाव, विधानपरिषदेतील कामकाजाचा अनुभव, लोकप्रतिनिधी व संघटन कार्यकर्त्यांशी असलेले संबंधामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. 

बातम्या आणखी आहेत...