आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक संस्था अन‌् महापालिकेच्या ग्रीन अार्मीची कमाल, दहा वर्षांमध्ये शहरात २८ लाख ९५ हजार वृक्षांची झाली वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सन २००७ मध्ये महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत १९ लाख वृक्ष शहरात अाढळून अाले हाेती. त्यानंतर २०१६ पासून सुरू असलेल्या गणनेत तब्बल ४७ लाख ९५ हजार ३८७ इतके वृक्ष आढळून आले आहेत. म्हणजेच या दहा वर्षाच्या काळात तब्बल २८ लाख ९५ हजार ३८७ इतक्या वृक्षांची संख्या वाढल्याची सुखद बाब पुढे अाली अाहे. शहरातील पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्था अाणि महापालिकेच्या 'ग्रीन अार्मी'च्या प्रयत्नातूनच हिरवाईत अशा पद्धतीने वाढ झाल्याचे स्पष्ट हाेत अाहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकाेणातून पाेलिस अकादमी अाणि महापालिकेच्या हद्दीतील लष्करी छावणीत सर्वेक्षण करण्यास संबंधित यंत्रणांनी हरकत घेतली अाहे. त्यामुळे यंदाची वृक्षगणना ९९ टक्यांवर अडकून बसली अाहे. महत्वाचे म्हणजे, यंदाची गणना ही जीपीएस कार्यप्रणालीद्वारे पूर्ण करण्यात अाली अाहे. 


महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून वृक्ष गणना न झाल्याने गेल्या पंचवार्षिक काळात वृक्ष प्राधिकरण समिती गठीत हाेऊ शकली नव्हती. सिंहस्थ काळात वृक्ष ताेडीच्या विराेधात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने काही निर्देश महापालिका प्रशासनाला दिले हाेते. यात वृक्ष गणना करण्याचे अादेश महापालिकेला देण्यात अाले हाेते. त्यानुसार मागील वर्षात वृक्ष गणनेचे काम एका खासगी कंपनीला देण्यात अाले. नोव्हेंबर २०१६ पासून वृक्षगणना सुरू झाली. प्रारंभी २० डिसेंबर २०१७ डिसेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात अाली हाेती. त्यानंतर या कामास फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात अाली. प्रत्यक्षात ९६ टक्के वृक्ष गणना हाेण्यास जून उजाडण्याची वाट बघावी लागली. 


महापालिकेचा अंदाजही ठरला फाेल 
वृक्ष गणना हाेण्यापुर्वी शहरात साधारणत: २५ ते ३० लाख वृक्ष असतील असे गृहीतक मांडण्यात अाले हाेते. प्रत्यक्षात ४८ लाख वृक्ष अाढळून अाल्याने प्रशासनाचा अंदाजही फाेल ठरला अाहे. 


शहराच्या मध्यवर्ती भागात अवघे १ टक्काच वृक्ष 
सर्वाधिक वृक्ष पंचवटी विभागात आढळून आले आहेत. एकूण वृक्षसंख्येच्या तुलनेत ही संख्या ३७ टक्के म्हणजे १७ लाख ५२ हजार १७७ इतकी आहे. त्याखालोखाल सिडको विभागात १५ लाख ८५ हजार ६१८ (३३ टक्के) इतके वृक्ष आहेत. शहरात सर्वाधिक प्रदुषण असलेल्या नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व विभागात वृक्षांचे प्रमाण अवघे एक टक्‍का इतकेच असल्याची बाब या गणनेतून पुढे अाली अाहे. त्यामुळे यापुढील काळात या दाेन विभागात वृक्ष लागवड अाणि संवर्धनाचा माेठा कार्यक्रम प्रशासनाला हाती घ्यावा लागणार अाहे. 


प्रभाग १९ मध्ये तब्बल ५ लाख ६५ हजार वृक्ष 
नाशिक रोडच्या प्रभाग एकोणीसमध्ये पाच लाख ६५ हजार ३६१ झाडे आढळली. इतर प्रभागांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ प्रभाग एकमध्ये चार लाख ९४ हजार ३२५ झाडे आहेत. ज्या भागातील झाडांची गणना झाली आहे. त्यात पाच ते दहा वर्षे वय असलेल्या झाडांची संख्या तीन लाख ९८ हजार १७७ आहे. 


जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड 
या वृक्ष गणनेत २१ ते ३० वयाेगटातील ४३ टक्के वृक्ष अाढळून अाली अाहेत. यावरुन रस्ता रुंदीकरणासह अन्य कामांमध्ये ३० वर्षावरील अनेक जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड पडल्याचे पुढे अाले अाहे. मात्र सरकारी जागांवरील वृक्ष जिल्हा रुग्णालय अाणि अन्य काही इमारतींचा अपवाद वगळता जैसे थे असल्याचे दिसते. 


रुद्राक्षासह दुर्मिळ प्रजातींचे तब्बल ७० वृक्ष 
२००७ मध्ये झालेल्या वृक्षगणनेत ५७ प्रकारची दुर्मिळ झाडे हाेती. यंदाच्या गणनेत तब्बल २५६ प्रकारच्या प्रजाती नाशिक शहरात आढळून आल्या अाहेत. त्यातील ७० वृक्षांच्या प्रजाती या दुर्मिळ आहेत. म्हणजेच गेल्या गणनेच्या तुलनेत यंदा दुर्मिळ प्रजातींमध्ये १३ वृक्ष वाढल्याचे स्पष्ट झाले अाहे. यात रुद्राक्ष, महारूख, माकड लिंबू, दांडुस, शेंद्री, वारस, मुचकुंद, सुरंगी, साई-आवळा, रबर ट्री राई-आवळा, नागकेसर, लिची, शमी, कावस, व्हाइट बॉटल ब्रश, गेला, भद्राक्ष, धत्रीफल, पिपली, बुरलीवड, कदंब, लोखंडी, उंडी, रानचिकू, करमाळ आदींचा अंतर्भाव अाहे. 


प्रथमच जीअायएस प्रणालीचा वापर 
जीआयएस व जीपीएस यंत्रणेद्वारे ही वृक्षगणना केली जात असून, गुगल मॅपवर आपल्या भागातील वृक्ष आता नागरिकांना पाहता येणार आहेत. वृक्षगणनेची माहिती नागरिकांसाठी ऑनलाइन स्वरूपात मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणना करताना वृक्षांची माहिती अत्याधुनिक पद्धतीने मोबाइल अॅपद्वारे डिजिटलाइझ करण्यात आली असून, सर्व वृक्षांची माहिती जीओ रेफरन्स पद्धतीने नकाशावर उपलब्ध आहे. 

बातम्या आणखी आहेत...