आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; वाइनचा फेस्टिव्हल !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये सध्या वाइनचा फेस्टिव्हल सुरू झाला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘सुला’चा तर त्यानंतर नाशिक व्हँली वाइन क्लस्टर यांच्या पुढाकाराने प्रत्येक आठवड्याला शेवटचे तीन दिवस याप्रमाणे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत अगदी घाऊक स्वरूपात वाइनचा उत्सव भरवला जाणार आहे. वाइन हा जसा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तद्वतच तो पश्चिम महाराष्ट्राचाही आहे. त्यातही विशेषकरून बारामतीकरांचा. त्यामुळे सत्तापदावर असो वा नसो, ग्लासमधील वाइनवर  बाह्यजगात जेव्हा केव्हा सार्वजनिक चर्चा होऊ लागते तेव्हा तिच्या केंद्रस्थानी साहेबांनी आजवर वाइन उद्योगाला केलेल्या मदतीवर बोलले जाऊ लागते. किंबहुना त्यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे एकेकाळचा हा शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग आजघडीला नावारूपाला येऊ शकला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्थानाचा हेतू ठेवून चालना मिळालेला हा उद्योग कालौघात अन्य बिगर शेतकरी व्यावसायिकांच्या हाती स्थिरावला. परिवर्तन हा काळाचा नियम आहे. त्याचाच एक प्रमुख भाग म्हणजे ‘वाइन टुरिझम’. 


उद्योग थाटल्यानंतर त्याचा प्रचार-प्रसार, मार्केटिंग, ब्रँडिंग या बाबीही ओघानेच आल्या. याचे प्रमुख कारण असे की, ‘वाइन इज हेल्थ ड्रिंक’ म्हणून अगदी सुरुवातीच्या काळात सरकारनेच वाइन निर्मिती तसेच उत्पादनाला चालना देण्याची भूमिका घेतली होती. सरकारचे रेड कार्पेट ‘व्हाइट’ अन् ‘रेड’ वाइनच्या स्वागतासाठी अंथरले गेले. एवढेच काय तर शासनाकडून मिळणाऱ्या सोयी-सवलतीही पुढील दशकभरापर्यंत वाइन उद्योगाला मिळू शकतील अशी तजवीज झालेली आहे. सुरुवातीच्या काळात वाइन ही आरोग्यदायी असली तरी तिची गणना दारू सदरातच केली जात होती. पण जेव्हा वाइन ही जनरल स्टोअर्समध्ये खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवावी असाही एक मतप्रवाह सरकारदरबारी व्यक्त होऊ लागला होता. सरकार बदलले तशा सत्ताधाऱ्यांच्या भूमिकाही कालपरत्वे बदलत गेल्या. 


वाइनचा फेस्टिव्हल अर्थात उत्सवाची परंपरा भारतात सुरू केली ती नाशिकच्याच सुला विनयार्डने. सदर परंपरेतील यंदाची अकरावी आवृत्ती होती. वाइनच्या प्रचार-प्रसारासाठी म्हणून सुरू झालेल्या फेस्टिव्हलची उंची दरवर्षाला कलाकलाने वाढत जाते आहे. या फेस्टिव्हलचा नावलौकिक देश-विदेशात पसरल्यामुळे आता आयोजकांना स्थानिक समस्या भेडसावू लागल्या आहेत. त्यामुळेच पुढच्या वर्षी हा नावाजलेला फेस्ट होतो की नाही याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. ही सर्व पार्श्वभूमी विशद करण्याचे कारण एकच की, सुलाचा फेस्ट आयोजित करण्याचा एक कॉर्पोरेट अंदाज अन् नाशिक व्हँली वाइन क्लस्टरने यंदा भरवलेला वाइनचा उत्सव यामध्ये महदंतर आहे. एका बाजूला देशविदेश पातळीवर फेस्टचा प्रचार व्हावा म्हणून विमान कंपन्यांपासून प्रमुख महानगरांमध्ये ब्रँडिंगचे तंत्र प्रभावीपणे राबवले जाते. विदेशातील रॉक ब्रँड असो की बॉलीवूडमधील नामवंत गायकांच्या कार्यक्रमांतून वाइनच्या तालावर तरुणाईला थिरकायला भाग पाडले जाते. गेल्या दोन वर्षांतील सुला फेस्टमधील वेगळेपण अर्थात बदल म्हणजे त्याला आलेले कौटुंबिक स्वरूप. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो कुटुंबे घरातील लहानसहान सदस्यांसह फेस्टला उपस्थित राहतात अन् खऱ्या अर्थाने आनंद लुटतात. त्या तुलनेत आताचा नाशिक व्हँली वाइन क्लस्टर असो की दोन वर्षांपूर्वीचे ऑल इंडिया वाइन प्रोड्युसर असोसिएशन आयोजित वाइन फेस्टिव्हल असो, त्यातील विस्कळीत नियोजनामुळे कधीच सर्वतोमुखी चर्चेचा फेस्ट वा उत्सव होऊ शकलेला नाही. राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून म्हणे कोटी-दीड कोटींचे द्रव्यार्जन होईल या भरवशावर प्रत्येक आठवड्यात तीन दिवस वाइनच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील डझनावारी वायनऱ्यांपैकी ज्या काही मोजक्या सध्या कार्यरत आहेत त्यांच्या स्थळांवर या उत्सवाचे वेळापत्रक निश्चित केले गेले आहे. वाइनची महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील एकमेव मातृसंस्था म्हणजे नाशिक – येवला मार्गावरील विंचूर वाइन पार्क. शासनाच्या पुढाकाराने या पार्कची उभारणी झाली. छगन भुजबळ मंत्री असताना या पार्कला वाइन पर्यटनाचा दर्जा मिळाला. हा सगळा आता इतिहास होत आला. पण विंचूर वाइन पार्क हा कधीच वाइनच्या चाहत्यांनी फुलला नाही वा तेथील उत्पादित वाइनचा दरवळही चाहत्यांना आकर्षित करू शकला नाही हे कटू  वास्तव आहे. सिनेसृष्टीतील दोन-चार ललनांना आता वाइनच्या डोहात डुबकी मारायला लावली काय अन् खडकावरून अलगद धार लावलेल्या वाइनच्या धबधब्याखाली अंघोळ घातली काय, शेवटी चाहत्यांना कसे आकृष्ट करतात यावर वाइनची चव अन् भवितव्य अवलंबून राहणार आहे.


- जयप्रकाश पवार, निवासी संपादक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...