आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावातही मुले पळवणाऱ्या टाेळीच्या \'संशयाचे भूत\'; जिंतूरच्या दांपत्याला बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव- मुले पळवणारी टाेळी असल्याच्या संशयावरून धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरात पाच जणांची ठेचून हत्या झाल्याच्या घटनेनंतर बारा तासांच्या अातच नाशिक जिल्ह्यातील मालेगावातही त्याची पुनरावृत्ती घडली. रविवारी रात्री अकराच्या सुमारास मालेगाव येथील सनाउल्लानगर भागात मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या संशयातून सोबत लहान मुलगा असलेल्या एका दांपत्याला धमकावले, तसेच पुरुषाला मारहाणही केली. 


काही साेशल मीडियातून ही बातमी शहरभर पसरली अाणि काही वेळातच आठ ते दहा हजार लाेकांचा जमाव रस्त्यावर उतरला. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. पिंपळनेरसारखी विपरीत घटना घडू नये म्हणून संशयितांना एका घरात कोंडून ठेवले. मात्र लोकांचा संताप अनावर झाला हाेता. माेठ्या संख्येने अालेल्या पाेलिसांनाही ते जुमानत नव्हते. 


जिंतूर (जि. परभणी) येथील एक दांपत्य मालेगाव शहरात पैसे मागत फिरत होते. त्यांच्याजवळ त्यांचा एक लहान मुलगाही होता. आमच्याकडे पीक-पाणी नाही, पैशांची मदत करा असे म्हणत ते फिरत होते. रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास काही लोकांना हे मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय आला. त्या संशयातून काही जणांनी काहीही न विचारता त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे दांपत्य घाबरले. त्यापैकी पुरुषाला जमावाने मारहाण केली. मात्र काही समजदार लोकांनी कायदा हातात घेऊ नका. पोलिसांना त्यांचे काम करु द्या असे आवाहन करत या दांपत्याला परिसरातील एका घरात सुरक्षितरित्या कोंडून ठेवले. काही वेळातच माजी आमदार मुफ्ती इस्माईलही दाखल झाले. त्यांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोक काही ऐकण्याचा मनःस्थितीत नव्हते. पाहता पाहता माेठा जमाव रस्त्यावर जमला. पाेलिसांचा माेठा फाैजफाटाही दाखल झाला. पोलिसांनी या दांपत्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. परंतु, जमलेल्या हजारो लोकांचा संताप अनावर झाल्याने त्यांना नियंत्रणात आणणे कठीण जात होते. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले हे पथकासह हजर झाले. दंगा नियंत्रण पथकही दाखल झाले. परंतु, दगडफेक सुरु झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र उशिरापर्यंत शहरात तणावाचे वातावरण कायम हाेते. दरम्यान, पाेलिसांनी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या दांपत्याला पाेलिस ठाण्यात अाणले. अाक्रमक जमाव पाहून हे दांपत्य खूप घाबरलेले हाेते. त्यांची चाैकशी करण्यात अाली. 


दगडफेकीत पाेलिस जखमी 
जमावाने केलेल्या दगडफेकीत २ ते ३ पोलिस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावर संतप्त नागरिकांनी दंगा नियंत्रण पथकाची व्हॅन उलटवली, तसेच एक दुचाकीही गटारीत फेकून दिली. रात्री उशिरा पाेलिसांनी येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. 

 

पुढील स्लाइडवर पाहा मारहाण झालेल्या दांम्पत्याचा फोटो...

बातम्या आणखी आहेत...