आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरपट्टीतील बंपरवाढीला ब्रेक लावण्याची महापाैरांची सर्वपक्षीय समितीसमाेर ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका अायुक्त तुकाराम मुंढे यांनी १८ वर्षे न झालेली करवाढ एकाच फटक्यात निवासीसाठी ३३ टक्क्यांपासून ते उद्याेगांसाठी ८२ टक्क्यांपर्यंत सुचवत घरपट्टीतील केलेल्या वाढीवरून सत्ताधारी भाजपवर सुरू असलेली टीका लक्षात घेत महापाैर रंजना भानसी यांनी करवाढीची तीव्रता कमी केली जाईल, असा अाश्वासक दिलासा सर्वपक्षीयांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड अॅग्रीकल्चर, निमा, आयमा, नाईस, धान्य व्यापारी संघटना आदी ३९ विविध संघटनांच्या प्रतिनिधींना दिला.

 

महासभेत घरपट्टीत बंपर वाढ केल्यामुळे विराेधी पक्ष अाक्रमक झाले हाेते. पाठाेपाठ शहरातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महासभेत भाजपने स्पष्ट बहुमताच्या रेट्यावर प्रस्ताव मंजूर केल्यानंतर विराेधकांनी करवाढीविराेधात सभागृहाबाहेर लढाईचा निर्णय घेतला. सर्व व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, अाैद्याेगिक संघटनांची एकत्रित माेट विराेधी पक्षनेते अजय बाेरस्ते, माजी उपमहापाैर गुरुमित बग्गा यांनी बांधली. त्याचाच एक भाग सर्वांनी दुपारी ४ वाजता महापाैरांची भेट घेत करवाढीसाठी कडाडून विराेध केला.


निवासी क्षेत्राबाबत करवाढ कमी करण्याबाबत ऐकिवात असून, त्याबराेबरच प्रचंड औद्योगिक मंदी लक्षात घेत येथील करवाढ कमी करावी असाही सूर व्यक्त झाला. अनेक कारखाने बंद पडले असून अनेक बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला करवाढ परवडणारी नसल्याचे निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी सांगितले. अाधीच मंदीचे वातावरण असल्याने अाणि त्यातच घरपट्टीवाढीमुळे नवीन फ्लॅट विक्री करणे जिकिरीचे होईल, अशी भीती महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केली. महापौरांनी शहराच्या विकासाला खीळ बसेल अशा पद्धतीची करवाढ करू नये, अशी मागणी माकप नेते डॉ. डी. एल कराड यांनी केली. सर्वांचे एेकून घेतल्यानंतर महापाैरांनी अामदार व पालकमंत्र्यांशी चर्चा करून सर्वांना सुसह्य ठरेल, अशीच करवाढ मंजूर केली जाईल असा दिलासा दिला.

 

यावेळी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर, गटनेते शाहू खैरे, राष्ट्रवादी कॉँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी उपमहापौर गुरमित बग्गा, प्रवीण तिदमे, भगवान दोंदे, भाकपचे राजू देसले, संतोष गायकवाड, मच्छिंद्र सानप, तसेच आयमाचे राजेंद्र आहिरे, लघुउद्योग भारतीचे मिलिंद कुलकर्णी, नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे शेखर दशपुते, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अंजू सिंघल, सिमेंट व्यापारी असोसिएशनचे मदन पारख, राजेश मालपुरे, सुनीता फाल्गुने, संतोष मुथा, प्रीतमसिंग बग्गा आदी उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...