आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनई हत्याकांड मागोवा; प्रकरण गुंडाळले होते, पण भावाने दिला लढा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- लष्कराच्या इन्फ्रंट्री बटालियनमधील जवान पंकज थनवारचा पाठपुरावा, जिद्द आणि हिंमत यामुळे सोनई हत्याकांड उघडकीस आले. भावाच्या संशयास्पद मृत्युची बातमी ऐकून पंकज तडक सोनईत पोहोचला. सहा फुट उंचीचा संदीप आणि फूटभर रुंदीची संडासची टाकी हे घटनास्थळ बघताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आणि पंकजने या प्रकरणात खोलवर उडी मारली आणि तपासाची दिशा बदलली. सध्या पंकज लडाखला भारतीय लष्कराच्या सेवेत आहे. गेल्या पाच वर्ष पंकजने केलेला सततचा पाठपुरावा, झुगरलेले सर्व दबाव आणि खंबीरपणे पीडितांना आधार देण्याची हिंमत यामुळेच सोनई हत्याकांडातील जातीय विद्वेष उघड झाला. हा लढा पंकजच्याच शब्दात...

 

गेली पाच वर्ष खूप भयंकर होती. २०१३ सालचा तो पहिला दिवस मी विसरू शकत नाही. जम्मूमध्ये माझे पोस्टींग होते. १ जानेवारीला संध्याकाळीच आईचा फोन आला, कामावर गेलेला संदीप घरी आला नव्हता म्हणून ती चिंतेत होती. येईल थोड्यावेळाने येईल म्हणत मी त्यांना धीर दिला. रात्री भावाचा फोन आला, दरंदलेंच्या संडासच्या टाकीत पडून संदीपचा मृत्यू झाल्याचा निरोप त्याने दिला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी  दुसऱ्याच दिवशी २ जानेवारीस नगरला पोहोचलाे. सोनई पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून संदीपच्या मृत्युची नोंद केली होती. पण संदीपचा सहा फुटी देह आणि सेफ्टीक टँकची अरुंद तोंड बघून त्यात पडून संदीपचा मृत्यू झाला यावर माझा विश्वासच नव्हता. तोपर्यंत संदीपसोबत गेलेले सचिन आणि राहूलही घरी न परतल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून कळाले. मला पटकन आठवले, काही दिवसांपूर्वी दरंदलेंच्या मुलीवर आपले प्रेम असून आपण लग्न करणार असल्याचे मला सचिनने सांगितले होते  आणि त्या दरंदलेंच्या संडासातच संदीपचा मृतदेह सापडला होता. माझ्या डोक्यात चक्र फिरायला लागली. मी पोलिसांच्या मागे लागलो. ३ जानेवारीला दरंदलेंच्या मळ्यातील विहिरीतून आणि बोरवेलमधून राहूल आणि सचीनच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांनी हस्तगत केले आणि प्रेमसंबंधांमुळेच या हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. 


५ जानेवारीला या प्रकरणातील सात आरोपींना अटक झाली आणि आम्हाला सोनईत राहाणे मुश्किल झाले. माझा भाऊ गेला होता. त्याचा नऊ महिन्याचा मुलगा वहिनीच्या पदरात होता.  सचिनची आई प्रचंड घाबरली होती. शेवटी सगळ्यांना घेवून आम्ही सोनई सोडलं आणि मालेगावला मावशीकडे राहायला आलो. २० जानेवारीला मी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली आणि या खटल्याचा तपास सीबीआयकडे देण्याची विनंती केली. तेव्हापासून गेली पाच वर्ष मी सातत्याने याचाच ध्यास घेतला.  नगरमध्ये आमच्यावर प्रचंड दबाव येत होता, त्यामुळे पहिल्यांदा औरंगाबादमध्ये हा खटला वर्ग झाला. सचिनच्या आईवर प्रचंड दबाव आला, त्या घाबरल्या म्हणून आम्ही त्यांना आमच्यासोबत ठेवले. पुढे औरंगाबादहून नाशिक न्यायालयात आला. खटल्याचा पाठपुरावा करता येईल म्हणून माझी देवळाली छावणीत बदली झाली. परंतु बदलीची मुदत संपत आली तरी खटल्याला वेग घेत नव्हता. गृहमंत्र्यांनी केलेली फास्ट ट्रँकची घोषणा हवेत विरून गेली होती. मधल्या काळात फक्त दोनच दिलासा देणाऱ्या घटना घडल्या, एक म्हणजे समाजकल्याण खात्याच्या वतीने माझ्या विधवा वहिनीला नोकरी मिळाली आणि दुसरं म्हणजे यातील सर्व आरोपींचे जामीन नाकारण्यात आले.  ही पाच वर्ष खूप कसोटीची होती. प्रचंड दबाव आला. समझौत्यासाठी दडपण आले, ऑफर आल्या. ज्यांना तपास करायचा तेच मध्यस्थी करीत होते. नंतर माझी लडाखला बदली झाली आणि लवकर न्याय मिळण्याची आशा मावळली.   १ जानेवारीस या घटनेला पाच वर्ष झाली. माझ्या मयत भावाचा नऊ महिन्यांचा निरज आज सहा वर्षांचा झाला आहे. आज या आरोपींवरील दोष न्यायालयाने मान्य केले याचे समाधान आहे, मात्र याचा सूत्रधार असलेल्या एकाची पुराव्याआभावी निर्दोष मुक्तता झाली याचे वाईट वाटते.