आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान अन् मध्य प्रदेशमधील उन्हामुळे नाशकात कांदा वधारला, लासलगावला १०५० रुपयांचा भाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला अाहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला माेठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. इतर राज्यांतून मागणी असल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत अाहे. मंगळवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी १०५० रुपये भाव मिळाला.  


लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ ते २० दिवसांपासून कांदा दरात वाढ हाेत आहे. दररोज ५० ते १०० रुपयांची  वाढ हाेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. एप्रिल महिन्यात बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा ६५० रुपयांनी विक्री केला होता. साधारणपणे २० मेपर्यंत हेच भाव हाेते. त्यानंतर सरासरी भाव ७०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.  


मे महिन्याच्या अखेरीस कांदा ८०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कांदा दराबाबत आशा पल्लवित झाल्या होत्या. कांदा हजारी पार करेल या अपेक्षेने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत होते. गेल्या तीन महिन्यांत दरात  तीनशे रुपयांची वाढ झाली. कांदा दरात तेजी अाली की, केंद्र सरकारतर्फे हालचाल करून भाव पाडण्याचे प्रयत्न केले जातात. 

चाळीत साठवलेला कांदा विक्रीस आणला जात असल्याने चार पैसे मिळावे, ही शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्यामुळे दर वाढले तरी शासनाने हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे.  लासलगाव बाजार समितीत दररोज १८ ते २० हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे. सोमवारी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कांद्यास सरासरी ९२० रुपये भाव मिळाला होता. मंगळवारी या भावाच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढ होऊन १०५० रुपये भाव मिळाला. यापुढे काही दिवस तरी कांदा दर कमी हाेण्याची शक्यता नसल्याचे जाणकार सांगत अाहे.   लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जून महिन्याच्या मध्यंतरी कांदा एक हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी जून महिन्यात कांद्याचे सरासरी दर ५५० रुपये होते. त्यात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले नाही. मात्र, यावर्षी उन्हाळ कांदा दुप्पट दराने मागील वर्षाच्या तुलनेत विकला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...