आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीडन ते आधाराश्रम... एक भावनाविवश प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तब्बल३६ वर्षांनंतर आधाराश्रमात आलेला जंगलू कमालीचा भावुक झाला हाेता. आपण काेठे वाढलाे, काेणी आपला सांभाळ केला, हे तो उत्सुकतेने बघत हाेता. आपल्यासारखेच बेवारस मुले बघून तो अक्षरश: ढसाढसा रडला.
जळगाव येथे १९७८ मध्ये साडेचार वर्षांचा जंगलू रडताना आढळून आला हाेता. त्याला नाशिकच्या आधाराश्रमात दाखल करण्यात आले. वर्षभर राहिल्यानंतर त्याला स्वीडनच्या दांपत्याने दत्तक घेतले. तेथे ट्रॅव्हलच्या व्यवसायात त्याचा जम बसला आहे. जन्मभूमीचे दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळी तो मुलगा डेव्हिडसह आधाराश्रमात आला. भारतातील कायद्यानुसार दत्तक दिल्यानंतर मूळ आई-वडिलांची माहिती संबंधित संस्थेला देता येत नाही, हे त्याला आधाराश्रमातील पदाधिकाऱ्यांनी पटवूनदिले. साेमवारी तो जळगावला जाणार आहे.
मैत्रिणींचीभेट : आधाराश्रमात फेडरिकच्या १९७८ च्या बॅचच्या सुचित्रा कुलकर्णी, चंद्रकला ढवळे, शीतल पडवळ या मैत्रिणींशी त्याची सरप्राइज भेट घालून देण्यात आली.आधाराश्रमात ३६ वर्षांपूर्वी दाखल झालेला जंगलू वर्तुळामध्ये, तर रविवारी स्वीडनहून आल्यानंतर मुलांमध्ये रमलेला जंगलू.
दत्तक पालक परिवाराची भेट
फेडरिकला भेटण्यास दत्तक पालक परिवार पाल्यांसह आला हाेता. संस्थेचे अध्यक्ष विजय दातार, सचिव प्रभाकर केळकर, सुनीता परांजपे, प्रा. निशा पाटील, केशव सहस्त्रबुद्धे, समन्वयक राहुल जाधव आदींनी त्याचे स्वागत केले.
जंगलू नावाचे रूपांतर आडनावात
फेडरिक जेव्हा जळगावला सापडला तेव्हा त्याचे नाव जंगलू असे तो सांगायचा. त्यामुळे आधाराश्रमात त्याला जंगलू नावानेच आेळखले जाई. दत्तक गेल्यानंतर फेडरिकने जंगलू हे नाव आडनावात रूपांतरीत केले. त्याच्या मुलाचे शाळेतील नाव डेव्हिड जंगलू असेच आहे.