आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अादिवासी पाड्यांवर स्वखर्चाने सोलर वॉटर हीटर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पर्यावरणाच्या रक्षणासाठी सेवाभावी संस्थांकडून विविध उपाय केले जातात. त्यातील काही फलदायी ठरतात, तर काही अपयशी. अशाच प्रकारे एका सेवाभावी संस्थेचे सदस्य असलेल्या डॉक्टरने वृक्षतोड रोखण्यासाठी स्वखर्चाने पाड्यांवर दोन सोलर वॉटर हीटर बसविले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्याने जंगलामध्ये लावलेल्या दीड लाख झाडांचे संगोपनदेखील स्वखर्चाने अखंडितपणे सुरू आहे.
वैद्यकीय क्षेत्रामधील नावाजलेले डॉ. विश्वास सावकार यांनी हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. बोरगडच्या पायथ्याशी तुंगलदरा आणि गवळीवाडा या अादिवासी पाड्यांवर नेचर सोसायटी (एनएसीए) यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्राच्या साहाय्याने येेथे सुमारे दीड लाख झाडे लावण्यात आली आहेत. संस्थेकडून या सर्व झाडांची देखभाल करणे शक्य नसल्याने डॉ. सावकार यांनी येथे स्वखर्चाने दोन पाण्याच्या टाक्या बसविल्या असून, चार मजुरांना मानधन देत उन्हाळ्यातही या झाडांना पाणी दिल्याने यातील बहुतांश झाडे जगविण्यात यश आले आहे. झाडे उंच वाढल्याने या परिसरात पर्जन्यमान वाढले आहे. पाऊस अधिक पडू लागल्याने शेती सुधारली. मात्र, गावकऱ्यांना इंधनासाठी जंगलातील झाडे तोडण्याशिवाय पर्याय नव्हता. वन विभागाच्या भीतीने रात्रीतून उभे झाड तोडले जाऊ लागले. पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब घातक असल्याने डॉ. सावकार यांनी गावातील चौकात दोन सोलर पॅनल बसविले. सुरुवातीला गावातील काही अप्रवृत्तीच्या लोकांनी विरोध केला. एका तरुणाने सोलरवर दगड फेकून नुकसान केले. दुसऱ्या सोलरचे उद‌्घाटन त्याच तरुणाच्या हस्ते करवून घेतल्याने आज तोच तरुण या सोलरचे संरक्षण करत आहे. गावातील सर्वच नागरिकांना आंघोळीसाठी गरम पाणी मुबलकपणे उपलब्ध होत असल्याने सर्व गावकऱ्यांना स्वच्छतेची सवय जडली आहे. या प्रयोगामुळे वर्षाला जवळपास पाच टन लाकूड वाचले. सुरुवातीला काहींनी टीका केली. मात्र, ५०० लिटरच्या दोन सोलरमुळे वर्षाला किमान पाच झाडे जिवंत राहात असल्याने ही शक्कल पर्यावरणाचे रक्षण करणारी ठरत असल्याने असे प्रयोग इतर अादिवासी पाड्यांवर आणि शहरातील झोपडपट्टी भागात राबविण्याचा डॉ. सावकार यांचा मानस आहे.

^शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिक इंधन म्हणून अाजही लाकडाचाच वापर करतात. या परिसरातील सार्वजनिक नळांच्या ठिकाणी सोलर बसविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे आयते गरम पाणी मिळाले, तर वृक्षतोड रोखली जाईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. - डॉ. विश्वास सावकार

बातम्या आणखी आहेत...