कळवण - मौजे शेरी दिगर येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या अशिक्षित लोकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणा-या आरोपींविरोधात अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ यांनी अभोणा पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिले आहेत.
आदिवासींच्या म्हणण्यानुसार सदर घटनेची तक्रार दाखल करून पोलिस चौकशी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे वृत्त दैनिक 'दिव्य मराठीने' प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कळवण तालुक्यातील मौजे शेरी दिगर येथील पुंडलीक सोनवणे, काशीनाथ सोनवणे, रामदास बोरसे, शिवाजी सोनवणे, नारायण सोनवणे, कमळाबाई सोनवणे यांच्या खासगी इनामी जमिनी शासनाने ताब्यात घेऊन त्याचे मूल्यांकन करून त्याबदल्यात लाभार्थीच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. त्यांचे बँकेचे चेकबुक व पासबुक स्वत:कडे ठेवत संशयितांनी लाभार्थ्यांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढून घेतल्याचा, फसवणूक झाल्याचा आरोप आहे. तसेच काढलेल्या रकमेपैकी 25 टक्केच रक्कम लाभार्थ्यांना दिली.
या आदिवासी बांधवांना मिळालेल्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम काही जणांनी परस्पर हडप केल्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी आमदार जे. पी. गावित यांनी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांच्याकडे केली होती.
आज संबंधितावर गुन्हा दाखल करणार
- उपविभागीय अधिकारी सचिन गुंजाळ यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मला दिले आहेत. त्यानुसार आपण तक्रारदाराला बोलविले आहे. मात्र, तक्रारदाराने कामानिमित्ताने बाहेरगावी असल्याचे सांगत उद्या येण्याचे सांगितल्यामुळे आपण उद्या संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहोत. रवींद्र देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक, अभोणा