आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’च्या धडाक्याने मेळास्थानक ‘साफ’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमीचे सरकार स्थापन होत असताना जल्लोष व धांगडधिंग्याला फाटा देत ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी अस्वच्छतेने बरबटलेले मेळास्थानक धडाक्यात साफ केले. एवढय़ावरच न थांबता महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील शौचालय साफ करून शहर स्वच्छतेचे काम अत्यंत सोपे असल्याचा संदेशही त्यांनी गांधीगिरीतून पालिकेतील धुरिणांना दिला.

यापूर्वी दिल्लीतील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याच्या आनंदात कार्यकर्त्यांनी केलेली घाण ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी साफ केली होती. शनिवारी दिल्लीत सरकार स्थापनेच्यानिमित्त सफाईची हाक देण्यात आली आणि मेळा स्थानकात 25 ते 30 कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेत सफाई सुरू केली. एक कपटाही तेथे राहाणार नाही तोपर्यंत सफाई सुरूच ठेवली. जवळपास अडीच तासाच्या पर्शिमानंतर स्वच्छ झालेले मेळास्थानक बघून कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत महापालिकेकडे मोर्चा वळविला. पाच लिटर फिनेल टाकून राजीव गांधी भवनाच्या प्रवेशद्वारालगत असलेले स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आले. महिलांनी पदर खोचून अगदी घरगुती पद्धतीने स्वच्छतागृहाची सफाई केली.

या वेळी जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, दौलत पवार, जगबिरसिंग, पद्माकर इंगळे, अपूर्व इंगळे, रवी घायाळ, भगवान जाधव, विलास देसले, विलास गोवर्धने आदी उपस्थित होते.

धांगडधिंगा टाळून सफाई
मद्याचे पेले रिचवून व मिरवणुका काढून रस्ते अडवित लोकांना वेठीस धरण्याऐवजी सफाई करून शहरवासीयांसाठी योगदान देण्याचा प्रयत्न ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केला. यात युवकांबरोबरच महिलाही या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने उतरल्या होत्या. इच्छाशक्ती असेल तर शहर स्वच्छ ठेवता येईल, हेही यानिमित्ताने समोर आले. जितेंद्र भावे

शौचालयाद्वारे प्रवाशांची लूट; कर्मचार्‍यांना गुलाबपुष्प
मेळा स्थानकात एक अनधिकृत शौचालय सुरू असून, येथे चक्क लघुशंकेसाठीही दोन रुपये घेतले जात असल्याचा प्रकार स्वच्छता मोहिमेदरम्यान चव्हाट्यावर आला. सर्वसाधारणपणे शौचासाठी जाणार्‍यांकडूनच पैसे आकारणी केली जाते. मात्र, येथे प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी आल्यावर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी पद्धतीने गुलाबाचे फूल देऊन शौचालय बंद करण्याचा इशारा दिला.